पठारभागात कट्टा बाळगणार्‍यास अटक! यापूर्वीही दाखल होता गुन्हा; पोलीस कोठडीत रवानगी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोणत्या ना कोणत्या कारणांनी नेहमीच चर्चेत असणार्‍या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दितून पुन्हा एकदा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत स्वतःजवळ गावठी बनावटीचे पिस्तुल आणि तब्बल पाच जीवंत काडतुसे बाळगणार्‍यास पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे यापूर्वीही सदरील इसमावर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल आहे. त्यावेळी त्याने अटकपूर्व जामीन मिळवला होता. यावेळी मात्र पोलिसांना कट्ट्याची माहिती मिळताच आरोपीला ताब्यात आले आणि नंतर कट्ट्याचा शोध घेण्यात आला. अशोक दगडू खेमनर असे घारगाव पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमवारपर्यंत त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता.14) पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना याबाबतची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला पाचारण करुन कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिसांनी सुरुवातीला आरोपीचा माग काढीत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिकची चौकशी करता सुरुवातीला उडवाउडवी करणार्‍या आरोपीने नंतर आपल्याजवळ गावठी कट्टा आणि काडतुसे असल्याचे मान्य केले.


त्यानंतर त्याला हत्यार कोठे लपवून ठेवले आहे याची चौकशी करता त्याने मांडवे बुद्रुक शिवारात असल्याची माहिती दिल्यानंतर पथकाने त्याच्यासह मांडव्याला धाव घेत अनिल कढणे या शेतकर्‍याच्या विहिरीची तपासणी केली असता विहिरीच्या कोपीत खड्डा करुन आरोपीने गावठी पिस्तुल व त्यासोबत पाच जीवंत काडतुसे लपवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केल्यानंतर आरोपीसह घारगाव पोलीस ठाणे गाठले.


याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी आरोपी अशोक दगडू खेमनर (वय25, रा.हिरेवाडी, पो.साकूर) याच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्याचे कलम 3/25, 5, 7 सह जिल्हाधिकार्‍यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला आज (ता.15) पहाटे अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईने पठारभागात खळबळ उडाली आहे. घारगावचे पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे, सुनील आहेर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर व चव्हाण यांचा या कारवाईत सहभाग होता.

Visits: 73 Today: 1 Total: 419670

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *