अखेर बारा तासानंतर अन्न व औषध विभागाने केला गुन्हा दाखल! गुटखातस्करांना आता जामिनासाठी जावे लागणार जिल्हा न्यायालयात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराच्या हद्दीवर पोलीस आणि अन्न व भेसळ विभागाने केलेल्या दोन स्वतंत्र कारवाया चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. एकाचवेळी आणि एकाच ठिकाणी झालेल्या या कारवायानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी गजाआड केले. तर अन्न व भेसळ विभागाला मात्र गुन्हा दाखल करण्यास तब्बल बारा तासांचा अवधी लागला. यावरुन सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या जिल्ह्यातील या विभागाची भूमिका पुन्हा एकदा संशयाच्या भवर्यात अडकली आहे. या दोन्ही कारवायांमधून पोलिसांनी 5 लाख 43 हजार 740 रुपयांच्या गुटख्यासह सुमारे साडेनऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एकूण तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्यांच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे.
2012 साली राज्यात गुटख्याचे उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्री करण्यास पूर्णतः बंदी आहे. असे असले तरीही गेल्या आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत राज्यातील गुटखा वितरण व विक्री रोखण्यात ना अन्न व औषध प्रशासनाला यश आले, ना पोलिसांना. त्यामुळे हे दोन्ही विभाग गुटख्यांवरील कारवायानंतर नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यातच प्रत्येकवेळी झालेल्या कारवाईत केवळ विक्रेत्यावर गुन्हे दाखल झाल्याने या कारवायाही संशयात अडकत गेल्या. गुटख्याचा साठा, वितरण व विक्री रोखण्याची थेट जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाचे तर सांगायलाच नको. कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणार्या या बेकायदा धंद्याला अन्न व औषध विभागातील काही लाचखोरांचे अभय असल्याने राज्यात गुटख्यावर बंदी येवून आठ वर्ष उलटूनही जिल्ह्यात कोठेही आणि कोणत्याही गुटख्याची कमतरता नाही यावरुन ही गोष्ट अधोरेखीत होते.
मंगळवारी (ता.12) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ एका संशयीत वाहनावर कारवाई करीत 3 लाख 21 हजार 140 रुपयांच्या गुटख्यासह 2 लाखांची मारुती ओमीनी गाडी जप्त केली. या प्रकरणात पोलिसांनी दोघा संजय व अक्षय या दोघा भागवत बंधुंना ताब्यात घेवून मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दोघांवरही गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. अलिकडच्या काळात संगमनेर तालुक्याच्या परिसरात झालेली ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
तर त्याचवेळी व जवळपास त्याच ठिकाणी टोलनाक्याजवळील गुरुकृपा अॅक्वाजवळील मोकळ्या पटांगनात असलेल्या मारुती ओमीनी (क्र.एम.एच.14/डी.एफ.7776) या वाहनावर नगरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचार्यांनी छापा घातला असता त्यात हिरा कंपनीच्या पान मसाल्याचे 1 लाख 78 हजार 80 रुपयांचे 1 हजार 448 पॅकेट, रॉयल 717 कंपनीचे 44 हजार 520 रुपयांचे तितकीच पाकीटे असा 2 लाख 22 हजार 600 रुपयांचा गुटखा आणि 2 लाख रुपयांचे वाहन असा एकूण 4 लाख 22 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतला.
पोलीस आणि अन्न व भेसळ विभागाची कारवाई जवळपास एकाच ठिकाणी व एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. पोलिसांनी कारवाईनंतर अवघ्या अडीच तासांतच दोघांवर गुन्हा दाखल केला व त्यांना गजाआड केले. मात्र अन्न व औषध प्रशासनाने सकाळी सव्वाआठ वाजता केलेल्या कारवाईचा गुन्हा मात्र तब्बल बारा तासांनंतर रात्री सव्वाआठच्या सुमारास दाखल झाला. या विभागाची ही भूमिका गुटखातस्करांशी संबंध असल्याचा संशय निर्माण करणारीच ठरली. सदरचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच दैनिक नायकने सदरच्या कारवाईचे वृत्त प्रसिद्ध केल्याने दबावातून विभागाला कारवाई करणं भाग पडलं अन्यथा ही कारवाई दाबली गेली असती अशी चर्चाही सुरू झाली होती. त्या दबावातूनच तब्बल बारा तासांनंतर अन्न व औषध प्रशासनाने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नगरच्या अन्न व औषध विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी उतेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनंतर तालुका पोलिसांनी घुलेवाडीतील गुटखा तस्कर संजय बाबुलाल लुंकड (वय 47) याच्यावर अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (4), 27 (3) (ड), 27 (3) (इ), 30 (2) (अ), 30 (1) (झेडझेड), 59 नुसार व भारतीय दंड संहितेचे कलम 188, 272, 273, 328 प्रमाणे गुन्हा दाखल करुन संशयीत आरोपीला गजाआड केले आहे. आत त्यालाही न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्याच्या कोठडीची मागणी करणार असल्याचे तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार इस्माईल शेख यांनी सांगितले. दोन्ही कारवाया मिळून पोलिसांनी 5 लाख 43 हजार 740 रुपयांचा गुटखा आणि चार लाख रुपयांची दोन वाहने हस्तगत केली आहेत.
आता भा.दं.वि. कलम 328 नुसारच कारवाई..
यापूर्वी गुटखातस्करांवर कारवाई झाल्यानंतर त्यांना लागलीच जामीन मिळत असत, त्यामुळे वारंवारच्या कारवाया होवूनही गुटखा तस्करीवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले होते. मात्र 9 जानेवारी रोजी अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी गुटख्यावरील कारवाईत 10 वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान असलेले भा.दं.वि. कलम 328 चा वापर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता यापुढे अशा कारवाईत अटक झालेल्या आरोपींना दीर्घकाळ तुरुंगात राहण्यासोबतच जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाचा दरवाजा गाठावा लागणार आहे. गुटखा तस्करांवर भा.दं.वि. कलम 328 नुसार कारवाई करण्याचा निर्णय चांगला असून त्यामुळे आतातरी गुटखातस्करीला आळा बसण्याची आशा आहे.