पृथ्वीची प्रतिकृती साकारुन विद्यार्थ्यांचे कोविडबाबत प्रबोधन वडगाव पान येथील डी. के. मोरे विद्यालयाचा प्रजासत्ताक दिनानिमित्त उपक्रम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील वडगाव पान येथील सह्याद्री बहुजन शिक्षण संस्थेचे डी. के. मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रबोधनाच्यादृष्टीने वेगवेगळ्या संकल्पना राबवत असते. यावर्षीही कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन मास्क, सुरक्षित अंतर व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थी, रांगोळी यांच्या माध्यमातून सुरक्षित अंतराचे पालन करुन पृथ्वीची प्रतिकृती साकारत तिला मास्क लावल्याचे दाखविले. यातून मास्क तंत्र विसरू नका… काळजी घ्या … सुरक्षित राहा! हाच सामाजिक संदेश देण्यात आला.

सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली जगत आहे. त्यावर अनेक प्रकारचे उपाय चालूच आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे. याचे प्रबोधन व्हावे म्हणून सामाजिक जाणिवेतून डी. के. मोरे विद्यालयात कलाशिक्षक सत्यानंद कसाब व क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर यांनी कोविड बचावाची संकल्पना मांडली. विद्यार्थी व रांगोळीच्या साहाय्याने सुरक्षित अंतर ठेवून पृथ्वीची प्रतिकृती काढून तिला मास्क लावलेला दाखविण्यात आला. त्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. ही रांगोळी काढण्यासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी वैभव थोरात, अविष्कार थोरात, जागृती थोरात, ऋतुजा थोरात, समीक्षा थोरात, आदिती काळे, पूर्वा मेहेत्रे, श्रृती वाकचौरे यांनी सहकार्य केले.

यावेळी प्राचार्य भाऊसाहेब शिंदे यांनी संदेशामध्ये सांगितले की, जगावर ओढवलेल्या महाप्रचंड साथीच्या रोगामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये अनेक निरपराध लोकांचे बळी गेले. प्रत्येकाचे आरोग्य धोक्यात आले असून, जगाचे आर्थिक, सामाजिक नुकसान झाले. त्यासाठी सर्वांनी आरोग्याकडे लक्ष देऊन कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक एस. के. सुर्वे, इन्चार्ज प्रा. बाबा गायकवाड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन पी. के. दये यांनी करुन आभार मानले.

Visits: 180 Today: 1 Total: 1854960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *