फसव्या घोषणा हाच भाजपाचा निवडणूक मंत्र : दिवटे जनाधार नसल्याने भावनीक मुद्द्यांना हात घालून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जनता जाणून असल्याचीही टीका..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य खूूप मोठे आहे. त्यांच्या कार्यातून आजच्या तरुणांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने पालिकेच्या क्रीडा संकुलाला त्यांचे नाव दिले गेले. मात्र भारतीय जनता पार्टीच्या मनात ते खूपत असल्याचे दिसत असून कोणताही जनाधार प्राप्त करण्यात त्यांना सातत्याने अपयश येत असल्याने अशाप्रकारचे भावनीक मुद्दे उपस्थित करुन जनतेची फसवणूक करण्याचे तंत्र त्यांच्याकडून राबविले जात आहे. हा प्रकार सूर्यावर थुंकण्यासारखा असून त्याचा कोणताही परिणाम निवडणुकांमध्ये दिसणार नाही. गेल्या तीन दशकांत शहराचा झालेला कायापालट जनता बघत असून आजवर संगमनेरकरांनी विकासाला साथ दिली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांकडून होत असलेल्या अशा फसव्या घोषणांना जनता भीक घालणार नसल्याचे घणाघाती प्रत्यूत्तर काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिले आहे.
शहर भाजपाने पालिकेच्या क्रीडा संकुलाच्या नामांतरावरुन उपस्थित केलेल्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना दिवटे यांनी वरील मत नोंदविले आहे. तीन दशकांपूर्वी डॉ. सुधीर तांबे यांनी पालिकेत काम करतांना नगराध्यक्ष कसा असावा याचा वस्तुपाठच निर्माण केला होता. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतांना त्यांनी शहराला विकासाची नवी दृष्टी दिली. त्यांचा पाच वर्षांचा कालखंड आजही संगमनेरकरांच्या स्मरणात आहे. त्यांच्यानंतर पदावर आलेल्या अन्य सगळ्याच नगराध्यक्षांनीही आपापल्या परिने शहराच्या विकासात योगदान दिल्याचेही दिवटे यांनी म्हंटले आहे.
भारतीय जनता पक्ष म्हणजे खोटे बोलं, पण रेटून बोल या तत्त्वावर काम करणारा आहे. त्यामुळे निवडणूका तोंडावर आल्या की कोणतातरी भावनिक मुद्दा उपस्थित करुन फसव्या घोषणा करायच्या आणि जनतेत संभ्रम निर्माण करायचा हा त्यांचा निवडणूक मंत्रच राहीला आहे. परंतु संगमनेरकर आजवर कधीही अशा फसव्या घोषणांना बळी पडलेला नाही. यावेळीही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि आता क्रीडा संकुलाबाबत फसव्या घोषणा केल्या असून जनता त्यांचा हेतू चांगलाच जाणून असल्याचेही दिवटे यांनी म्हंटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचेच नव्हेतर संपूर्ण देशाचे आराध्य आहेत. त्यांचे भव्य-दिव्य आणि आकर्षक स्मारक व्हावे ही माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांची संकल्पना आहे. त्यासाठी पालिकेकडून कार्यवाही देखील सुरु करण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या कालावधीत कोविड संक्रमण आणि त्यानंतर कार्यकाळ पूर्ण झाल्याने ती संकल्पना प्रत्यक्षात उतरली नाही. मात्र आगामी कालावधीत संगमनेर नगरपालिकेकडून शिवरायांना साजेसे स्मारक संगमनेरात निर्माण होईल अशी ग्वाही देखील दिवटे यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात आज संगमनेर शहराचा मोठा लौकिक आहे. शहराच्या प्रगत बाजारपेठेत व्यापारी निर्भयपणाने व्यापार करु शकतात. शहरात शांततेची नांदी असल्याने विविध राष्ट्रीय बँकांचे जाळे विस्तारले गेले असून त्याद्वारे दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शहरातील अंतर्गत रस्ते, सांडपाणी वाहून जाण्यासाठीची भूमिगत यंत्रणा, पिण्यासाठी भरपूर पाणी मिळावे यासाठी थेट निळवंडे धरणातून टाकलेली पाईपलाईन, शहरात विविध शासकीय विभागांची कार्यालये व त्यांच्या आकर्षक इमारती, एखाद्या महानगराच्या धर्तीवर बांधलेले सुसज्ज असे बसस्थानक, पुणे-नाशिक बायपास मार्गासह सध्या जून्या महामार्गाचे सुरु असलेले चौपदरीकरणाचे काम यातून शहराने प्रगतीची नवी उंची गाठली असून ती रोखण्यासाठीच विरोधकांकडून वारंवार असे बिनबुडाचे आरोप केले जात असून शहराच्या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीकाही दिवटे यांनी केली आहे.