विरोधकांनी वार केले तर आपणही हल्ला करणार ः डॉ. लहामटे अकोले नगरपंचायत रणसंग्राम; विरोधकांवर जोरदार टीकास्त्र

नायक वृत्तसेवा, अकोले
शहरातील जनतेच्या डोळ्यात मला विश्वास दिसत आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर जनता नगरपंचायत राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या ताब्यात देणार आहे. निवडणुकीत आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहे. मात्र विरोधकांनी राळ ओकली तर आपणही सभा घेऊन उत्तर देऊ. यापुढे विरोधकांनी जर वार केले तर आपणही हल्ला करू, असा इशारा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला.

अकोले नगरपंचायत निवडणुकीतील 4 प्रभागातील राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ अगस्ति महाराज मंदिरात नारळ वाहून करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते सीताराम गायकर, शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, प्रा.सुरेश खांडगे, महेश नवले, अशोक देशमुख, बाळासाहेब ताजणे, प्रा.संपत नाईकवाडी, सुरेश गडाख, राष्ट्रवादी युवकचे रवींद्र मालुंजकर, शिवसेना शहराध्यक्ष नितीन नाईकवाडी यांसह प्रभाग चारचे शिवसेना उमेदवार श्रीकांत मैड, प्रभाग अकराच्या उमेदवार वंदना शेटे, प्रभाग तेराच्या उमेदवार आरती लोखंडे व प्रभाग चौदाचे उमेदवार पांडुरंग डमाळे उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार डॉ. लहामटे म्हणाले, अकोले शहरातील सर्व प्रभागांतील जनता त्रस्त आहे. शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी निवडणूक लढवत आहे. कोरोना संकटकाळ असतानाही तालुक्याच्या विकासासाठी आपण कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. औद्योगिक वसाहतीचाही सर्व्हे सुरू आहे. देवी घाट रस्ता कामाची निविदा निघाली आहे. स्वतःकडून काम झाले नाही म्हणून दुसर्‍याकडूनही काम होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. नगरपंचायत निवडणुकीत मागील 13 उमेदवार राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीचे निवडून येणार आहे. त्यामुळे खरा पोटदुखीचा आजार विरोधकांना झाला आहे. आम्ही त्यांच्यावर बोलत नाही केवळ विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहोत. ते मात्र माझ्यावर व गायकर साहेबांवर टीका करत आहे. जनतेला माहीत आहे आमदार किरण लहामटे काय आहे. मी अजूनही सामान्य माणूस असून माझ्या घरी नोकर चाकर नाही. त्यामुळे कितीही टीका केली तरी मी तालुक्याच्या जनतेला दिलेला शब्द पाळणार असल्याचा विश्वास दिला.

यावेळी ज्येष्ठ नेते सीताराम गायकर म्हणाले, शहरातील विकासाचा अनेक वर्षाचा बॅकलॅाग भरून काढायचा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी निवडणूक लढवत आहे. आपल्या 40 वर्षांच्या राजकारणात शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरोघरी जाणारा आमदार डॉ. किरण लहामटेंच्या रूपाने पहिल्यादांच पाहिला आहे. आपण तालुका एकसंघ ठेवण्याचे काम केले आहे. शहर विकासासाठी अनेक वर्ष प्रयत्न केले आहे. कोणत्याही भूलथापांना मतदारांनो बळी पडू नका, शहराचा विकास राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच करु शकते. मागे काही दिवस आम्ही भाजपात गेलो होतो; मात्र मागील पाच वर्षे सत्ता नसल्याने काहीच काम करता आले नाही. विकासकामे करण्यासाठी सत्ता असावी लागते. आता राज्यात आमच्या राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीची सत्ता आहे. तालुक्यात सत्तेतील आमदार डॉ. किरण लहामटे आहेत. तालुक्याची राजधानी अकोले शहर असून शहराचा चेहरामोहरा बदलून स्वच्छ व सुंदर अकोले शहर बनविण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन गायकर यांनी केले. यावेळी डॉ. मनोज मोरे, अनिल कोळपकर, गणेश कानवडे, विकास शेटे, ईश्वर वाकचौरे, संतोष नाईकवाडी, राजेंद्र लोखंडे, नवनाथ शेटे, भागवत शेटे, अमित नाईकवाडी, सुरेश लोखंडे, अक्षय आभाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर यांनी करुन आभार मानले.

Visits: 113 Today: 2 Total: 1419858

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *