रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा द्या! आमदार आशुतोष काळेंच्या साईबाबा संस्थानच्या रुग्णालयांना सूचना

नायक वृत्तसेवा, शिर्डी
श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये राज्याच्या कानाकोपर्‍यातून विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात. प्रत्येक रुग्णाला साईबाबांनी केलेली दीनदुबळ्यांची सेवा डोळ्यासमोर ठेऊन उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा द्या, अशा सूचना श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी संस्थानच्या रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

श्री साईनाथ रुग्णालय व साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सोयी-सुविधांबाबत संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच बैठक घेऊन पाहणी केली. यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, साईनाथ रुग्णालय व सुपर हॉस्पिटलमध्ये येणारे बहुतांशी रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. अशा रुग्णांना इतर मोठ्या दवाखान्यांत उपचार घेणे शक्य नसते. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक रुग्ण आरोग्य सुविधेच्या बाबतीत समाधानी होणे गरजेचे आहे. या रुग्णांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने योग्य ती काळजी घ्या. यावेळी हॉस्पिटलच्या अडचणी व कर्मचार्‍यांच्या अडचणी आमदार आशुतोष काळे यांनी जाणून घेत त्या अडचणी सोडविण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व हॉस्पिटल प्रशासन कर्मचार्‍यांचे 100 टक्के लसीकरण करून घ्यावे, अशा सूचनाही आमदार काळे यांनी केल्या.

Visits: 232 Today: 1 Total: 2179044

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *