नेत्यांच्या मागे धावत पिढ्या खपविणार्यांसाठीच ‘शिवशक्ती’ : मुंढे गेल्या 25 वर्षांत राजकारणाचे बिभत्स रुप पाहिल्याचाही केला घणाघात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात घराणेशाही सोबतच भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत, मी देखील त्यातून सुटलेली नाही. ज्या देशात वंदे मातरम् आणि भारत माता की जय म्हणण्याची संस्कृती आहे, त्या देशात अशाप्रकारे वाढत असलेले अत्याचार अतिशय चिंताजनक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ठाम उभे राहून सुराज्य निर्माण केले होते. त्यांचाच आदर्श घेवून मी शिवशक्ती पक्षाची स्थापना केली असून पिढ्यान्पिढ्या नेत्यांचे झेंडे खांद्यावर घेवून आपल्या घराची राखरांगोळी करणार्या सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेवून राज्यातील घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात निवडणुका लढविणार असल्याची घोषणा करुणा धनंजय मुंढे यांनी आज संगमनेरात केली. आपल्या नवीन पक्षाची माहिती देण्यासाठी त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला असून त्याची सुरुवात आज त्यांनी संगमनेरातून केली, त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, राज्यातील विविध निवडणुकांमधून विजयी होणार्या उमेदवारांना शासनाकडून मानधनासह आवश्यक असलेल्या गोष्टी विनामूल्य पुरविण्यात येतात. मात्र असे असतानाही राज्यात व देशात दररोज वाढणारा भ्रष्टाचाराचा आलेख कमी झालेला नाही. त्यामुळे मी समविचारी कार्यकर्त्यांना सोबत घेवून शिवशक्ती पक्षाची स्थापना केली असून पक्षातर्फे निवडणूक लढविणार्या प्रत्येक उमेदवाराचे नाव जाहीर करण्यापूर्वी भ्रष्टाचार करणार नाही याबाबत त्यांचे प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे. अशी व्यक्ती निवडून आल्यानंतर आपल्या कार्यकाळात त्यांना कोणत्याही नवीन गोष्टी खरेदी करता येणार नाहीत व कोणत्या संस्थेचे संचालकपदही मिळवता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आज राज्यातील सत्तास्थानी असलेल्यांमध्ये माझे पतीही असून माझ्या आयुष्याची 25 वर्षे मी त्यांना दिली आहेत. इतकी वर्षे सोबत राहूनही माझे पती माझे अथवा माझ्या मुलांचे होवू शकले नाहीत तेव्हा ते सामान्य नागरिकांचे काय होतील असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. या कालावधीत मी माझ्याच घरात पाहिलेले राजकारणाचे स्वरुप अतिशय घाणेरडे असून त्यात बदल व्हावेत असे मला मनापासून वाटत असल्याचेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा दबदबा आहे, श्रीगोंदा तालुका तर त्या पक्षाचा गड समजला जातो. असे असतानाही तेथील सामान्य नागरिकांना मात्र स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांनंतरही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावे लागते. यावरुन आजच्या राजकारण्यांचे गचाळ राजकारण लक्षात येते असे त्यांनी सांगितले.

माझा मुलगा शिशीर धनंजय मुंढे याने बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी करावी अशी माझ्या पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे, मात्र मला ती मान्य नसून आपण या पक्षाची स्थापनाच घराणेशाहीच्या विरोधात केल्याचे त्या म्हणाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता सेनापती होते, तरीही त्यांनी गुलामीच्या बेड्या झुगारुन तत्कालीन मुघल, आदिलशाह व निजामाविरोधात दंड थोपटून सामान्य जनतेला आपलेसे वाटणारे स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यात घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा लवलेशही नव्हता. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारणातील घराणेशाही, भ्रष्टाचार व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात आपण राजकारणाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील गरीब नागरीक व ज्यांनी आयुष्यभर आपला नेता, मग त्यांची बायको, मुलगा-मुलगी, सूना यांचा जयजयकार करीत त्यांचे झेंड उचलण्यात हयात घालविली आणि त्यातून आपल्या पिढ्या खपविल्या अशा लोकांनी शिवशक्ती पक्षात यावे असे आवाहनही त्यांनी केले.

‘25 वर्षांत जे माझे व माझ्या मुलांचे झाले नाहीत, ते तुमचे कसे होती?’ असा प्रश्न उपस्थित करुन करुणा मुंढे यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत आपले पती व राज्याचे मंत्री धनंजय मुंढे यांच्यावर अप्रत्यक्षपणे तोफा डागल्या. मी गृहिणी म्हणून कधीही घराबाहेर पडले नव्हते, या कालावधीत राजकारणाचे बिभत्स स्वरुप मी माझ्याच घरात पाहिले आणि अनुभवले. त्यातूनच घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा बिमोड करण्याची प्रेरणा मला मिळाली आणि मी जनतेच्या समोर आले असे करुणा धनंजय मुंढे यांनी सांगितले.

