तीन चिमुकल्यांसाठी पोलीस निरीक्षक ठरले ‘देवदूत’ प्रसंगावधान राखत पेटत्या कारमधून काढले बाहेर..

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पेटत्या कारमधून तीन चिमुकल्यांना प्रसंगावधान राखत बाहेर काढले. मंगळवारी (ता.11) रात्री हा थरार अनुभवण्यास मिळाला. चिमुकल्यांसाठी ते देवदूतच ठरले. या धाडसाचे आणि कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातील बसस्थानक समोरील गणेश फरसाणमध्ये मंगळवारी (ता.11) रात्री एक पालक फरसाण खरेदीसाठी गेले होते. त्याचवेळी त्यांच्या कारमध्ये (क्र. एमएच.17, बीएक्स.6181) तीन चिमुकले होते. यावेळी अचानक कारला आग लावली. येथून जाणारे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या निदर्शनास हा गंभीर प्रकार आला. पोलीस निरीक्षक देसले यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान राखत या तीन चिमुकल्यांना पेटत्या कारमधून बाहेर काढले. तर फरसाण दुकानातील पाण्याचा जार घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धाडसी कृत्याची शिवसेनेने दखल घेत भरत मोरे, गगन हाडा, रमेश गवळी, गणेश देवकर, संजय वाणी, चेतन सपकाळ, श्रेयस तुरकणे, दशरथ राऊत आदिंनी कौतुक केले. तसेच शहरवासियांकडून देखील कौतुकाचा वर्षाव होत आहे.
