पिंजर्‍यामध्ये भक्ष्य ठेवूनही बिबटे पिंजर्‍यात येईना! प्रवरानगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


नायक वृत्तसेवा, राहाता
पिंजर्‍यामध्ये भक्ष्य ठेवूनही बिबती पिंजर्‍यात येईना. यामुळे लोणी खुर्द, लोहगाव व प्रवरानगर परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या एक ते दीड महिन्यांपासून लोणी खुर्द व लोहगाव परिसरातील शेतामध्ये व मोकळ्या असणार्‍या जागेमध्ये बिबट्या मादी त्याच्या दोन बछड्यांसह या भागात फिरताना अनेक शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ व नागरिकांनी पाहिले असून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केल्यानंतर लोणी खुर्द भागात दोन पिंजरे गेल्या एक महिन्यापासून उसाच्या कडेला ठेवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये भक्ष्यही ठेवण्यात आले होते. परंतु या पिंजर्‍याकडे बिबट्यांनी सपशेल पाठ फिरवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

त्यातील एक पिंजरा ठेवलेल्या जागेवरून काढून दुसर्‍या एका मोकळ्या जागेत असणार्‍या झुडूपाच्या कडेला ठेवण्यात आला असल्यामुळे आतातरी बिबट्या या पिंजर्‍यात भक्ष्य पकडण्यासाठी घुसेल असे या भागातील नागरिकांना वाटत होते. मात्र गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बिबट्या मात्र या पिंजर्‍याकडे येऊन जात असल्याचे रात्रीच्यावेळी कर्तव्यावर असणार्‍या रक्षकाच्या लक्षात आले आहे. या बिबट्यांना पकडण्यासाठी आता करावे तरी काय, असा प्रश्न नागरिकांसह वन विभागाच्या अधिकार्‍यांना पडला आहे. या पिंजर्‍यामध्ये असणारे भक्ष्य दिवसभर बाहेर ठेवून त्यानंतर रात्रीच्या वेळी या पिंजर्‍यात ठेवले जात असून यासाठी पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी, जमादार, सुरक्षा रक्षक व या भागातील नागरिक बिबटे कधी पिंजर्‍यात बंदिस्त होतात याची सध्या वाट पाहत आहे.

Visits: 242 Today: 2 Total: 2057687

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *