शेतकऱ्यांना नागवणारा वायरमन अखेर अडकलाच..! अवैध मार्गाने पैसा मिळवून उभ्या केलेल्या इमल्यातच दोन हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्याच गावातील गोरगरीब नागरिक व शेतकऱ्यांना नागवून त्यांच्याकडून मोठ्या रकमा वसूल करणाऱ्या व हरामाच्या पैशातून भलामोठा इमला बांधून राहणारा हिवरगाव पावसा येथील लाचखोर वायरमन श्रीधर परशराम गडाख अखेर लाचलुचपत खात्याच्या सापळ्यात अडकला. कायदेशीरपणे वीज जोडणी मागणाऱ्या ग्राहकाकडून दोन हजारांची लाच स्वीकारताना त्याच्याच मालकीच्या किराणा दुकानात त्याला पकडण्यात आले. विशेष म्हणजे हंगामी तत्त्वावर खासगी ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या या महाभागाने गेल्या दहा वर्षात एकाच ठिकाणी स्थिरावून हिवरगाव पावसा सबस्टेशनच्या अंतर्गत काम करताना मोठी माया जमवली. आता त्याच्यावर कारवाई झाल्याने हिवरगाव पावसा व रायतेवाडी परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे कुरण समजली जाणारी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. गेंड्याचे कातडे पांघरुन वावरणाऱ्या या खात्यातील असंख्य अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना पैशांसाठी सतत नागवित असतात. त्यातूनच वीज कंपनीतील अगदी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते वायरमन पर्यंतच्या कर्मचाऱ्यांं पर्यंत बहुतेक सर्वांचेच हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यात आता खासगी ठेकेदारामार्फत मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सहाय्यक कर्मचाऱ्यांची हिवरगाव पावसातील लाचखोर वायरमनच्या रुपाने भर पडली आहे. गेल्या दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी स्थिरावलेल्या या महाभागाने वेळोवेळी वीज कंपनीच्या ग्राहकांना विविध कारणांनी नागवून प्रचंड संपत्ती जमा केली आहे. आज अखेर त्याच्या पापाचा घडा भरल्याने तो अलगद सापळ्यात अडकला.
चंदनापुरी वर्ग एक अंतर्गत हिवरगाव पावसा सबस्टेशन क्षेत्राचे कामकाज सांभाळणाऱ्या श्रीधर परशराम गडाख (वय 40 वर्ष, रा.हिवरगाव पावसा) हा हंगामी तत्त्वावरील वायरमन आपल्याच गावातील एका ग्राहकाच्या विनंती अर्जा नुसार त्याला वीज जोडणी दिली. मात्र सध्या नवीन मीटर शिल्लक नसल्याने तोपर्यंत अनधिकृतपणे विज वापरण्यासाठी त्याने संबंधित ग्राहकाकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास सदरची रक्कम घेऊन तो ग्राहक या लाचखोराच्या हिवरगाव पावसा मधील आलिशान इमल्यातील किराणा दुकानात गेला व तेथे त्याने सदरची रक्कम त्याच्या हाती सोपवली. मात्र तत्पूर्वी संबंधित ग्राहकाने याबाबत अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही केली होती. त्यानुसार या लाचखोराच्या दर्शन किराणा स्टोअर्स भोवती सापळा रचण्यात आला होता.
हरामाचा पैसा कमावण्यात सराईत झालेल्या या बेईमान वायरमनला आपल्याभोवती कायद्याचा फास गुंडाळला गेल्याची कल्पनाही आली नाही. ग्राहकांच्या रुपात त्याच्याच दुकानात उभ्या राहिलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख पटवून घेण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे त्यांच्याच समोर अगदी बिनधास्तपणे लाच स्वीकारताना तो त्याच्याच दुकानात धरला गेला. त्याच्यावरील सापळा यशस्वी होताच हिवरगाव पावसासह परिसरातील असंख्य नागरिक व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या दहा वर्षापासून या लाचखोर हंगामी कर्मचाऱ्याने शेकडो जणांना नागवून मोठी माया जमा केली आहे. आता तो सापळ्यात अडकल्याने संबंधित विभागाने त्याच्या येथील कालखंडात त्याने कमावलेल्या अवैध संपत्तीचा शोध घेऊन ती जप्त करावी अशीही मागणी नागरिकांकडून पुढे येऊ लागली आहे.
Visits: 210 Today: 3 Total: 1111132

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *