अखेर महसूल विभागाची नदीलगतच्या घाटांवर धडक कारवाई! दोन रिक्षा ताब्यात घेत वाळूसाठे जप्त; चार दिवसांत तिघे तस्करही हद्दपार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशान्वये संगमनेर तालुक्यातील नद्यांमधून होणार्‍या बेसुमार वाळू उपशावर नियंत्रण आले असले तरीही भंगारातील रिक्षा, बैलगाड्या आणि गाढवांचा वापर करुन नदीतून वाळू चोरी सुरुच आहे. याबाबत दैनिक नायकने मंगळवारी वास्तवाचे दर्शन घडविल्यानंतर महसूल विभागाने आज सकाळी गंगामाई घाटावर धडक कारवाई करीत दोन रिक्षांसह मोठ्या प्रमाणात वाळूसाठे ताब्यात घेतले आहेत. अर्थात महसूलचे पथक पोहोचताच वाळुचोरांनी धूम ठोकल्याने कोणीही हाती लागले नाही. याशिवाय विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर पाळत ठेवणार्‍या खबरीलालची महागडी मोटारसायकलही जप्त करण्यात आली असून गेल्या चार दिवसांत तिघा वाळू तस्करांना जिल्ह्यातून हद्दपारही करण्यात आले आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महसूलमंत्रीपदाची शपथ घेताच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील विविध नद्यांमधून होणार्‍या प्रचंड वाळू उपशावर नियंत्रण आणण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकार्‍यांना बजावले. अहमदनगर जिल्हा मंत्री विखेंचे होम ग्राऊंड असल्याने त्यांच्या या आदेशाची जिल्ह्यात आणि त्यातही संगमनेरात अतिशय कठोरपणे अंमलबजावणी सुरु झाली. त्यामुळे त्यापूर्वी ट्रॅक्टर, हायवा व डंपरच्या माध्यमातून होणारी वाळू चोरी कमी होवून त्याजागी कालबाह्य झाल्याने भंगारात गेलेल्या रिक्षा, बैलगाड्या व गाढवांवरुन वाळू वाहतूक करणार्‍यांना सुगीचे दिवस आले.

मागील सहा महिन्यांच्या कालावधीत वाळू चोरी करणार्‍यांची ही जमात अतिशय जोमात आली. कोणत्याही भांडवलाशिवाय दररोज हजारों रुपयांची कमाई होत असल्याने अशाप्रकारे वाळू चोरी करणार्‍यांची संख्याही या कालावधीत अनेक पटींनी वाढली. त्यामुळे एकीकडे बेकायदा वाळू उपशावर नियंत्रण येवून सध्या सुरु असलेली असंख्य बांधकामे थांबलेली असतांना दुसरीकडे निर्माण झालेल्या याच पोकळीचा फायदा घेत रिक्षा, बैलगाड्या व गाढवांद्वारे वाळू चोरी करणार्‍यांनी अशा अडलेल्या बांधकामांना हेरुन मनमानी पद्धतीने पैसे घेवून वाळू पुरवठा सुरु केल्याने मोठी नाराजी निर्माण झालेली होती. त्यातच वाळू उपसा बंद असल्याचे सांगितले जात असले तरीही शहराच्या रस्त्यारस्त्यावर दिवसाढवळ्या रिक्षा आणि गाढवांवरुन वाळू वाहतूक करणारे दृष्टीस पडतच राहील्याने महसूल विभागाबाबतही संशय निर्माण झाला होता.

गेल्या मंगळवारी (ता.3) याबाबत दैनिक नायकने आवाज उठवताना प्रवरा पात्रालगतच्या गंगामाई घाटापासून ते पुणे-नाशिक महामार्गावरील पुणे नाक्याजवळील पुलापर्यंत रिक्षा आणि बैलगाड्या तर म्हाळुंगी नदीपात्रातून गाढवांद्वारे कशा पद्धतीने अनिर्बंधपणे वाळू चोरी सुरुच आहे याचे वास्तव दर्शन घडवले होते. याच वृत्तात सध्या नदीपात्रात आवर्तनाचे पाणी सुरु असतांनाही वाळू चोरांकडून बैलगाडीच्या सहाय्याने पात्रातून वाळू उपसून ती घाटावर आणली जाते व तेथून रिक्षांद्वारे गोण्यांमध्ये भरुन कशा पद्धतीने वितरित होते यांचा लेखाजोखाच मांडला होता. या वृत्ताची दखल घेत तहसीलदार अमोल निकम यांनी बुधवारी सर्व नायब तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारे वाळू चोरी होत असल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार संगमनेर सज्जाचे तलाठी पोमल तोरणे यांनी आपल्या सहकार्‍यांसह आज (ता.5) भल्या सकाळीच गंगामाई घाटापासून धडक कारवाईस सुरुवात केली. यावेळी महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांवर पाळत ठेवून त्यांच्या हालचाली वाळू तस्करांना देणार्‍या एका खबरीलालचा पाठलागही करण्यात आला. मात्र तो आपल्या ताब्यातील महागडी मोटारसायकल सोडून पसार झाला. यावेळी पथकाने गंगामाई घाटाच्या परिसरात वाळू चोरांनी गोण्यांमध्ये भरुन थप्प्या मारुन ठेवलेली शेकडो गोण्या वाळू पुन्हा नदीपात्रात सोडून आसपास दिसणार्‍या सर्व रिकाम्या प्लॅस्टिकच्या गोण्यांना आग लावली व त्या नष्ट करण्यात आल्या.

या कारवाईच्या वेळी गंगामाई घाटाच्या परिसरात अनेक नागरिक सकाळी फिरायला आलेले होते. त्यांनीही या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले. दररोज वाळू तस्करांकडून सुरु असलेला हा प्रकार अतिशय वेदनादायी होता, मात्र तक्रार आणि कारवाईची सोय नसल्याने आम्ही निमूटपणे प्रवरामाईवरील हा अत्याचार आम्ही फक्त उघड्या डोळ्यांनी बघत होतो. आजच्या कारवाईने यावर काही प्रमाणात निर्बंध येतील अशी प्रतिक्रियाही यावेळी काहींनी व्यक्त केली. गंगामाईवरील कारवाईनंतर महसूलच्या पथकाने पुणे नाक्यापर्यंतच्या परिसरात धडक मारली. मात्र सुरुवातीच्या कारवाईची इत्यंभूत माहिती आधीच शेवटपर्यंत पोहोचलेली असल्याने पथकाच्या हाती नंतर काहीच लागले नाही.

आज सकाळी महसूलच्या पथकाने केलेल्या कारवाईत कालबाह्य झालेल्या दोन रिक्षांसह मोठ्या प्रमाणात वाळुसाठाही जप्त केला. याशिवाय गेल्या चार दिवसांपूर्वी संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी धांदरफळ खुर्द येथील सागर उर्फ शक्तिमान तुकाराम कोकणे व जोर्वे रोडवरील अरबाज करीम शेख या दोघा वाळूतस्करांना एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केल्यानंतर आज (ता.5) शीतलामाता मंदिराजवळ राहणार्‍या मंगेश सुरेश घुले या वाळूतस्करालाही उद्यापासून (ता.6) एक वर्षांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसांत प्रांताधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार संगमनेर शहरातील दोघांसह तिघांना हद्दपार करण्यात आले आहे.


सध्या तालुक्यातील अवैध पद्धतीने गौणखनिजाची वाहतूक करणार्‍या मोठ्या वाहनांवर कारवाई सुरु आहे. मात्र त्याचवेळी आडवाटांचा वापर करुन काही जणांकडूने रिक्षाद्वारे वाळू चोरी होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. महसूल विभागाने आता त्यावरही कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली असून अशाप्रकारची वाहने ताब्यात घेतली जात आहेत. लवकरच जप्त केलेल्या अशा सर्व वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. यासोबतच अशा पद्धतीने वाळू चोरी करणार्‍यां विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईसह दोनपेक्षा अधिकवेळा गुन्हे दाखल झालेल्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासही सुरुवात झाली आहे.
– अमोल निकम
तहसीलदार, संगमनेर

Visits: 51 Today: 1 Total: 439532

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *