शरीरसुख नाकारणार्‍या गर्भवती सुनेची हत्या नराधम सासर्‍याने चिमुकल्या नातीलाही संपवलं


नायक वृत्तसेवा, शेवगाव
नाती आणि माणुकीलाही काळीमा फासणारी घटना शेवगाव तालुक्यातील मजलेशहर या गावात घडली आहे. सहा महिन्यांपासून सुनेकडे शरीर सुखाची मागणी करणार्‍या सासर्‍याने अखेर गरोदर सुनेचा गळा आवळला, तर दोन वर्षांच्या नातीला पाण्यात बुडवून खून केला.

कारभारी ज्ञानदेव लोढे (वय 62 वर्ष, रा. मजलेशहर) असं नराधम सासर्‍याचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेचा भाऊ तिला यात्रेसाठी घेऊन जाण्यासाठी आलेला असतानाच ही घटना उघडकीस आली आहे. ऋतुजा संतोष लोढे (वय 22 वर्ष) व समृद्धी संतोष लोढे (वय 2 वर्ष) यांचा खून झाला आहे. ऋतुजा ही पाच महिन्यांची गरोदर होती. ऋतुजाचे चुलते जनार्धन नारायण मगर (रा. मजलेशहर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारभारी ज्ञानदेव लोढे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, की ऋतुजाचा सासरा तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. तिच्याकडे गेल्या काही महिन्यांपासून शरीर सुखाची मागणी करीत होता. ती त्याला नकार देत होती. या रागातून त्याने गुरूवारी सायंकाळी तिचा गळा आवळून खून केला, तर नात समृद्धी हिला पाण्याच्या टबात बुडवून मारले. ही घटना घडली तेव्हा ऋतुजाचा भाऊ ऋषीकेश तिला भावीनिमगाव येथे यात्रेसाठी घेऊन जाण्यास आला होता. तो तिच्या घरी पोहचला तेव्हा ऋतुजा बाहेर ओट्यावर पडलेली होती. तर सासरा कारभारी याने समृद्धीला पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये बुडवून दाबून ठेवले होते. ऋषीकेश याने पळत जाऊन समृद्धीस सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने तिला ओट्यावर फेकून दिले. ऋषीकेश याने आरडाओरड केल्याने घरातील इतर लोक बाहेर आहे. त्यानंतर दोघींना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तोपर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी ऋतुजाचे चुलते जनार्धन मगर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी कारभारी ज्ञानदेव लोढे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Visits: 129 Today: 1 Total: 1580001

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *