महिन्याभरानंतर जिल्ह्यात आज उच्चांकी रुग्णसंख्या आली समोर! शून्य शासकीय अहवालांमुळे संगमनेरकरांना आजही दिलासा; सहा तालुक्यातील संक्रमण मात्र वाढले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाचा दुसरी लाट ओसरत आहे असे चित्र दिसत असतांना गेल्या सात दिवसांपासून जिल्ह्याच्या सरासरी रुग्णगतीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोविड नियमांची पायमल्ली होत असल्याचे निष्कर्ष समोर येवू लागले असून काही तालुक्यांच्या संक्रमणगतीत वाढ झाली आहे. अर्थात आजही शासकीय प्रयोगशाळेचे अहवाल अप्राप्त असल्याने संगमनेर तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोविडच्या जिल्ह्यातील इतिहासात पहिल्यांदाच संगमनेर तालुका दैनंदिन रुग्णसंख्येच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावरुन थेट तेराव्या स्थानावर घसरला आहे. आज शहरातील तिघांसह तालुक्यातून एकूण 21 रुग्ण समोर आले असून रुग्णसंख्या 23 हजार 499 झाली आहे.
कोविड संक्रमणाची दुसरी लाट आणण्यात राज्यभरात साजरे झालेले जंगी विवाह सोहळे, निवडणुका, राजकीय, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आणि नियमांची सर्रास पायमल्ली ही कारणे प्रमुख ठरली होती. त्याचा परिणाम राज्यभरातील लाखों नागरिकांना भोगावा लागला. कोविडच्या दुस्रया संक्रमणाने अहमदनगर जिल्ह्याची अवस्थाही अत्यंत भयानक पातळीवर नेवून ठेवली होती. यासर्व गोष्टी प्रत्यक्ष अनुभव करुन अथवा उघड्या डोळ्यांनी बघूनही पुन्हा जिल्ह्यातील अनेकजण ‘ये रेऽ माझ्या मागल्या..’ प्रमाणे पुन्हा तिच चूक करण्यासाठी धडपडत असल्याने संक्रमणाची तिसरी लाटही आता जिल्ह्याच्या जवळपास फिरकू लागल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे. आज समोर आलेले अहवाल हेच सांगत असून गेल्या 13 दिवसांतील उच्चांक 635 रुग्ण आज समोर आले आहेत. यापूर्वी 18 जून रोजी जिल्ह्यात 621 रुग्ण आढळले होते. त्यानंतर खालावलेली रुग्णसंख्या आजच उंचावली आहे.
एकीकडे जिल्ह्यातील जवळपास निम्म्या तालुक्यांमधील रुग्णगतीत भर पडलेली असताना आज शासकीय प्रयोगशाळेच्या विश्रांतीमुळे सलग दुसर्या दिवशी संगमनेर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला. खासगी प्रयोगशाळेचे 16 आणि रॅपिड अँटीजेनचे पाच अशा एकवीस अहवालातून आज शहरातील तिघांसह 21 जण बाधित झाल्याचे आढळले. त्यात शहरातील संगमनेर असा उल्लेख असलेल्या 80, 44 व 37 वर्षीय महिलांसह ग्रामीणभागातील 13 गावांमधून 18 रुग्ण समोर आले. त्यात चिंचोली गुरव येथील 55 वर्षीय इसम, कौठे कमळेश्वर येथील 29 वर्षीय तरुण, खांडगाव येथील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिक,
गुंजाळवाडी येथील 96 वर्षीय वयोवृद्धेसह 50 वर्षीय महिला, साकूर येथील 54 वर्षीय इसम, रायते येथील 45 वर्षीय महिला, हिरेवाडीतील (साकूर) 17 वर्षीय तरुण, आश्वी बु. येथील 55 व 52 वर्षीय महिलांसह 40 वर्षीय तरुण, मांडवे बु. येथील 35 वर्षीय महिला, कुरकूटवाडी येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 63 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 55 वर्षीय महिला, माळेगाव येथील 50 वर्षीय इसम व पिंपळगाव माथा येथील 50 वर्षीय इसमासह 29 वर्षीय तरुण बाधित झाले आहेत. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुका आता 23 हजार 499 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
तब्बल महिन्याभरानंतर जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आज सहाशेच्याही पुढे गेली. आज शासकीय प्रयोगशाळेचे अवघे 45, खासगी प्रयोगशाळेचे 222 व रॅपीड अँटीजेनचे 368 अहवाल मिळून जिल्ह्यातील 635 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. त्यात पारनेर तालुक्यात आज तीन आकडी उच्चांकी 136 रुग्ण आढळले. त्या खालोखाल कर्जत 83, पाथर्डी 60, शेवगाव 49, जामखेड, नेवासा व कोपरगाव प्रत्येकी 34, श्रीगोंदा 33, नगर ग्रामीण 31, अकोले 26, राहुरी 25, अहमदनगर महापालिका क्षेत्र व संगमनेर प्रत्येकी 21, श्रीरामपूर 18, राहाता 15, इतर जिल्ह्यातील 12 व भिंगार लष्करी परिसरातील तिघांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 85 हजार 863 झाली आहे.