पालिकेच्या निवडणुका होईस्तोवर पूल होवू नये म्हणून काहींचे प्रयत्न! माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा घणाघात; लोकांची गैरसोय दूर करुन श्रेय घेण्याचाही सल्ला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या वर्षी धरणांच्या पाणलोटात झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हाळुंगी नदीला मोठा पूर येवून त्यात प्रवरा परिसराला जोडणारा मुख्य पूल खचला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्या परिसरात राहणार्‍या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सदरचा पूल खचल्यापासून आपण आपल्या पातळीवर या पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत. मात्र काहीजण पालिका निवडणुका होईस्तोवर हा पूल होवूच नये यासाठी प्रयत्न करीत असल्याचा घणाघात राज्याचे माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केला. नागरिकांची अडवणूक करण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून राज्यात ज्यांची सत्ता आहे त्यांनी या पुलाचे काम करावे आणि त्याचे श्रेयही घ्यावे असा सल्लाही त्यांनी दिला.

सोमवारी (ता.24) माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खारघर दुर्घटनेबाबत राज्य सरकारचा निष्काळजीपणा, राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील बेबनावाच्या बातम्या आणि राज्य सरकारचा कारभार अशा सर्वच विषयांवरील प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी संगमनेरच्या म्हाळुंगी पुलाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, पाण्याच्या मोठ्या लोंढ्यामुळे म्हाळुंगीचा पूल खचला. तेव्हापासून साईनगर, पम्पिग स्टेशन, प्रवरा परिसर व त्या भागातील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. या घटनेनंतर आपण प्रत्यक्ष तेथे जावून अधिकार्‍यांना तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. मुंबईत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देवून निधीची मागणीही केली होती. राज्यात विरोधी पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे विरोधातील लोकप्रतिनिधींची तातडीने कामे होण्याची शक्यता कमी असतानाही आपण सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करीत असल्याचे थोरात यांनी सांगितले.

परंतु, काही मंडळी मंत्रालयात जावून या पुलाचे काम होवूच नये यासाठी प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप करताना त्यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी विरोधकांकडे मुद्देच नसल्याने त्यांना म्हाळुंगीचा खचलेल्या पुलावर राजकारण करायचे असल्याचा घणाघातही त्यांनी केला. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना थोरात म्हणाले की, मध्यंतरी सदरील पुलाबाबत आपण नगरपालिकांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट घेतली होती. या चर्चेदरम्यान आपण त्यांना भाजपच्या ‘त्या’ ज्येष्ठ नेत्याबाबत सांगतांना मुंबईत त्यांचे ‘मोठे वजन’ असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले व पुलाच्या कामाचे अंदाजपत्रक (इस्टिमेट) त्यांनाही देण्याची सूचना केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून या पुलाचे काम आपल्याकडून होत नसेल तर ‘त्यांच्या’कडून होईल आणि त्याचे संपूर्ण श्रेयही आपण त्यांनाच देवू अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी यावेळी केली.

संपूर्ण राज्यातच बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. संगमनेर अथवा राहात्यामध्ये महाविकास आघाडीने पॅनल उभा केला आहे. त्यादृष्टीने प्रचाराचे नियोजनही करण्यात आले आहे. ही लोकशाहीची प्रक्रिया असून ती सुरु असल्याचेही थोरात म्हणाले. एखाद्या वक्तव्यावरुन कशा पद्धतीने निर्णय प्रक्रिया होते. गुजरातमध्ये तक्रार केली जाते, तेथेच त्यावर निर्णय होतो, दोन वर्षांसाठी खासदारकी रद्द केली जाते आणि लगेच घरही खाली करण्याची नोटीस बजावली जाते. या सगळ्या घटना राजकारणाचा स्तर किती खालावलाय याचे मूर्तीमंत उदाहरण असून तो अत्यंत दुर्दैवी आहे, राजकारणात व्यक्तिगत द्वेष नसावा या विचाराचे आपण असल्याचे त्यांनी सांगितले.

2014 नंतर देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आले आणि तेव्हापासूनच सुडाचे राजकारण सुरु झाल्याची टीकाही त्यांनी केली. लोकशाहीत भिन्न विचारसरणीचे राजकीय पक्ष, त्यांची एकमेकांशी मतमतांतरे, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असतातच. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण अनेक पंतप्रधान पाहिलेत, अगदी भाजपाच्या अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळही आपण बघितला. परंतु देशात कधीही अशाप्रकारचे सुडाचे आणि द्वेषाचे राजकारण केले जात नव्हते अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

Visits: 5 Today: 2 Total: 23107

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *