हॉटेलमधील महिलेची निर्घृण हत्या करणारे आरोपी जेरबंद लोणी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत दोघांना केले गजाआड

नायक वृत्तसेवा, राहाता
शेजारी राहात असल्याने महिलेशी झालेल्या किरकोळ वादातून तिची लोणीच्या हॉटेल पाकिजात निर्घृण हत्या करणार्‍या काका-पुतण्यास पोलिसांनी 24 तासांत जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी हा लोणी-बाभळेश्वर रस्त्यावरील एका हॉटेलमधील वेटर आहे.

सोमवारी रात्री लोणी बुद्रुक (ता. राहाता) येथील संगमनेर रस्त्यावरील हॉटेल पाकिजामधील कामगार महिला रंजना विश्वनाथ मोहिते हिची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. सदर महिला हॉटेलमध्ये एकटीच राहात असल्याने आरोपी शोधून काढणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. मात्र पोलीस अधीक्षक आणि वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, मोबाईल सेल यांच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे आणि लोणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी 24 तासांत आरोपी शोधून त्यांना जेरबंद केले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपी भारत तुकाराम लष्करे (वय 22, मूळगाव चक्कर गल्ली, बाह्यवळण रस्ता, धुळे) हा लोणी-बाभळेश्वर रस्त्यावरील एक हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. तो पाकिजा हॉटेल जवळच राहायला होता. त्याचे आणि रंजनाचे किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याचा राग डोक्यात ठेऊन आरोपी भारतने त्याच्या अल्पवयीन पुतण्याला लोणीत बोलावून घेत रंजनाची निर्घृण हत्या केली. हॉटेलमधील लोखंडी पळा त्याने हत्यार म्हणून वापरला. पुतण्याने रंजनाला पकडून ठेवले आणि काकाने तिच्यावर वार करून तिचा खून केला. आरोपीने जेरबंद झाल्यानंतर पोलिसांना गुन्हा केल्याची कबुली देताना वरील माहिती दिल्याची लोणी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपी पकडण्यात यश मिळवल्याने त्यांच्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Visits: 152 Today: 1 Total: 2057313

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *