सत्ताधारी व अपक्ष आमदारांकडून एकाच पंचारतीने आरती! संगमनेरात विविध चर्चांना उधाण; राजकीय तणावातही दिलासादायक चित्र..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच महायुतीचे आमदार अमोल खताळ आणि विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्या समर्थकांमध्ये विविध कारणांवरुन राजकीय खटके उडत आहेत. त्यातच अलिकडच्या काळात घडलेल्या कीर्तनकार हल्ला प्रकरणापाठोपाठ आमदार खताळांवरील हल्ल्याने संगमनेरचे राजकीय वातावरण ऐन गणेशोत्सवात ढवळून निघालेले असतानाच एक अतिशय दिलासादायक प्रसंग समोर आला आहे. अगदीच योगायोगाने घडलेल्या या प्रसंगात विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी बोलावलेली सत्ताधारी आणि अपक्ष आमदार ‘द्वयी’ काही क्षणांच्या अंतराने एकाचवेळी उपस्थित झाल्याने पर्यायाच्या अभावाने दोघांनाही एकाच पंचारतीने बाप्पांची आरती ओवाळावी लागली. विशेष म्हणजे त्यांच्या पश्चात गोसेवकांकडून मनमानी होत असल्याचा आरोप करणार्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार आणि गोसेवक कुलदीप ठाकूर यांनाही त्याच पद्धतीने गणरायाची करुणा भाकावी लागली. हा प्रसंग अकस्मात घडला असला तरीही त्यातून राजकीय चर्चांनाही वाटा फूटल्या असून गेल्याकाही दिवसांपासून निर्माण झालेल्या प्रचंड राजकीय तणावातही काहीसा दिलासा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

मंगळवारी (ता.2) गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी बाजारपेठ व्यापारी मंडळाने आपल्या गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला.
त्याच्या शुभारंभासाठी त्यांनी आजी-माजी आमदारांसह काही मान्यवरांनाही निमंत्रित केले होते. त्यानुसार माजीमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योजक मनीष मालपाणी, नीलेश जाजू व राजेंद्र काजळे आदींनी ठरलेल्या वेळी उपस्थित राहून श्रींची आरतीही केली आणि नारळही वाढवला. त्यानंतर या सर्वांनी काहीवेळ सलामी देणार्या वाद्यवृंदांचे वादन ऐकून कार्यकर्त्यांचा निरोप घेतला. काही वेळाने विधान परिषदेचे सदस्य, आमदार सत्यजीत तांबे कार्यक्रमस्थळी आले, मंडळाच्या पदाधिकार्यांकडून त्यांचे स्वागत होत असतानाच आमदार अमोल खताळही तेथे हजर झाले.

संगमनेरच्या राजकीय जडणघडणीत भाजप, शिवसेनेसह उजव्या विचारांचे पक्ष एकीकडे तर, काँग्रेसह धर्मनिरपेक्ष व समाजवादी, डाव्या विचारांचे पक्ष दुसरीकडे असे चित्र बघायला मिळते. त्यामुळे पदावीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ऐनवेळी वडिलांच्या जागी भाजपच्या समर्थनाने अपक्ष उमेदवारी दाखल करुन निवडून आलेल्या सत्यजीत तांबे यांना सुरुवातीपासूनच येथील उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचा विरोध सहन करावा
लागला. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्याशीही चांगला सुसंवाद प्रस्थापित केला. विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात परिवर्तन घडल्यानंतर हा विरोध टोकाचा झाला. त्यातच पदवीधरच्या कक्षा ओलांडून आमदार तांबे यांनी आपल्या राजकीय संबंधाचा वापर करुन संगमनेरच्या विकासकामांमध्ये अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केल्याने हा संघर्ष अधिक टोकाचा झाला.

यासर्व गोष्टींचे प्रतिबिंब शहरातील प्रत्येक सण-उत्सवातही उमटू लागल्याने संगमनेर राजकीय हॉटस्पॉट बनले आहे. अलिकडच्या काळात घुलेवाडीतील कीर्तनात घडलेला प्रकार आणि त्यानंतर राज्यभर गाजलेल्या विविध बातम्यांमधून उठलेला राजकीय धूरळा आत्ता कोठेतरी खाली बसत
असताना गेल्या आठवड्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याने संगमनेरचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या घटनेनंतर महायुतीने षडयंत्राचा आरोप करुन निषेध मोर्चाही काढला आणि सभेसमोर झालेल्या भाषणातून माजीमंत्र्यांसह आमदार सत्यजीत तांबे यांच्यावरही आसूड ओढले गेले. यासर्व घडामोडी संगमनेरचे राजकीय वातावरण तापवणार्या ठरल्या आणि त्यातून मोठा राजकीय तणावही निर्माण झाला.

छोट्या-छोट्या गोष्टीतून होणार्या राजकीय संघर्षात शहराच्या शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झालेला असताना मंगळवारी योगायोगाने व्यापारी मंडळाच्या बाप्पांसमोर घडलेला हा प्रसंग मात्र तणावातही दिलासा देणारा ठरला. कार्यकर्त्यांच्या आग्रहावरुन दोघाही लोकप्रतिनिधींना आपल्या प्रत्येकी एका हाताने पंचारती पकडून बाप्पांची आरती ओवाळावी लागली असली तरीही दोघांनी बाप्पांकउून मात्र काय मागितले असेल यावरुन
विविध चर्चा रंगल्या आहेत. मात्र निव्वळ योगायोगाने काही मिनिटांसाठी घडलेला हा प्रसंग राजकीय तणावातही हास्याच्या रेषा उमटवणारे ठरले हे मात्र निश्चित. आरतीनंतर दोघाही नेत्यांच्या समर्थकांनी आपापल्या नेत्याला खांद्यावर उचलून नाचण्याचाही आनंद घेतला, त्यावरुनही राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

संगमनेरात राजकीय परिवर्तन झाल्यापासूनच पदावीधरचे आमदार सत्यजीत तांबे आपल्या कक्षा ओलांडून विधानसभा मतदारसंघातच अधिक सक्रिय असल्याचे आरोप त्यांच्यावर वारंवार करण्यात येतात. त्यातूनच त्यांच्या समर्थकांशी आमदार अमोल खताळ यांच्या समर्थकांचे नेहमीच राजकीय खटके उडत असल्याचे यापूर्वीही वेळोवेळी समोर आले आहे. त्यातून निर्माण झालेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोघाही नेत्यांनी गेल्या आठ महिन्यात एकाच मंचावर येण्याचेही प्रकर्षाने टाळले होते. मात्र म्हणतात ना, देवाच्या दारात सगळेच समान या तत्वानुसार मंगळवारी योगायोगाने का होईना दोन्ही नेत्यांना एकाचवेळी एकाच कार्यक्रमासाठी हजर व्हावे लागले आणि योगायोगानेच एकाच पंचारतीने बाप्पांची करुणाही भाकावी लागली, या प्रसंगाच्या छायाचित्रांनी सोशल माध्यमात मात्र अक्षरशः धुमाकूळ घातला असून मोठ्या राजकीय तणावातही काहीसा दिलासा निर्माण झाला आहे.

