अकोलेतील नोकरदाराला सात लाखाला गंडा घातला सायबर पोलिसांत गुन्हा दाखल; आमिषांना पडले बळी
नायक वृत्तसेवा, अकोले
विविध आमिषे दाखवून नोकरदाराला 7 लाख 19 हजार 642 रुपयांना ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष नारायण वाकचौरे (वय 44, रा. अकोले) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
2 डिसेंबर 2021 ते 18 जानेवारी 2022 दरम्यान ही घटना घडली आहे. वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क केलेले अंशुसिंह, चरणसिंह, जयवर्धनसिंह, प्रवीण बन्सल यांच्याविरुद्ध गुन्हा सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरूवातीला संतोष यांना अंशुसिंह याने दोन वेगवेगळ्या क्रमांकावरुन संपर्क करून डि-मॅट अकाउंटचा यूजर आयडी व पासवर्ड घेतला. यानंतर चरणसिंह याने संतोष यांच्याशी संपर्क करून शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. जयवर्धनसिंह याने एका क्रमांकावरून संपर्क करून केदार फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा मॅनेजर बोलतो, असे सांगून सिंगापूर एक्सचेंजमधील गुंतवणूक केलेल्या रकमेचा नफा पाहिजे असल्यास फॉरेन्स करन्सी टॅक्स भरावा लागेल, असे सांगितले.
तसेच प्रवीण बन्सल नामक व्यक्तीने संतोष वाकचौरे यांच्यासोबत संपर्क करून डि-मॅट अकाउंटमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम काढून घेण्यासाठी अधिक रक्कम भरण्यास भाग पाडले. अशा पध्दतीने वरील व्यक्तींनी संतोष वाकचौरे यांच्याशी संपर्क करून त्यांच्या खात्यातील 7 लाख 19 हजार 642 रुपये ऑनलाईन काढून घेतले आहे. अधिक तपास सायबर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे करत आहे.