पोलिसांच्या नाकावर टिच्चून सोनसाखळी लांबविली! चोरट्यांचे पोलिसांनाच आव्हान; गुन्हेगारीचा वाढलेला स्तरही चिंताजनक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहराच्या विविध भागात घडणार्या गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने मनोबल उंचावलेल्या चोरट्यांनी आता पोलिसांसमोरच आव्हान उभे करायला सुरुवात केली आहे. असेचं काहीसे सांगणारी घटना मंगळवारी (ता.7) दुपारी समोर आली असून चक्क पोलीस निरीक्षकांच्या दालनासमोरुन जात चोरट्यांनी मूळच्या वसईत राहणार्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीसह सोन्याचे पदक लांबविले आहे. सदरचा प्रकार अगदी पोलिसांच्या नाकावर टिच्चूनच झाल्याने चोरट्यांना आता पोलिसांचे भय राहिले की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता.7) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली. मूळच्या वसईत राहणार्या मनीषा रामनाथ वाघ या कामानिमित्त संगमनेरात आल्या होत्या. पोलीस ठाण्यासमोरील रस्त्याने क्रीडा संकुलाकडे जात असताना संजय गांधी नगर वसाहतीसमोर पाठीमागून आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी आणि त्यात ओवलेले सात हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पदक ओरबाडून क्रीडा संकुलाकडील रस्त्याने धूम ठोकली. या प्रकारानंतर त्या महिलेने आरडाओरड केल्याने आसपासच्या काही नागरिकांसह पोलीस ठाण्यातील काही कर्मचारीही चोरट्यांच्या मागे धावले, मात्र जीवावर उदार असलेले चोरटे वायूवेगाने अदृश्य झाले. याप्रकरणी सायंकाळी उशिराने शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे पुढील तपास करीत आहेत.

गेल्या काही महिन्यांत शहरासह संगमनेर तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातही संगमनेर शहर पोलीस ठाणे आघाडीवर असून गेल्या वर्षीच्या तुलनेत संगमनेर शहर हद्दीतील गंभीर गुन्ह्यांच्या आकडेवारीत तब्बल 52 टक्के चिंताजनक वाढ झाली आहे. घटनेनंतर पोलीस ठाण्यात केवळ गुन्हे दाखल करण्याचे सोपस्कार केले जातात, अपवाद वगळता पोलिसांना एकाही गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. त्याचाच परिणाम गुन्हेगारांना आता पोलिसांचाही धाक राहिला नसल्याचे मंगळवारी घडलेल्या घटनेतून अगदी स्पष्ट झाले आहे.

सदरची घटना शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या दालना समोरुन जाणार्या रस्त्यावरच घडली आहे. या प्रकरणातील चोरटे या दालना समोरुनच अवघ्या पन्नास मीटर अंतरावर गेले आणि त्यांनी सदर महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडीत त्याच मार्गाने पुढे क्रीडा संकुलाजवळून पसार झाले. या घटनेनंतर नेहमीप्रमाणे आरडाओरड, धावपळही झाली मात्र हाती धुपाटणे सोडून काहीच लागले नाही. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या डायरीत आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे.

शहरातील सोनसाखळी लांबविण्यासह अन्य गुन्हेगारी घटना नियंत्रित असाव्यात यासाठी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शहरातील प्रमुख चौकात बंदोबस्तासह पोलीस ठाण्याची दोन्ही वाहने सतत गस्तीवर ठेवण्याचे नियोजन केले आहे. वाहतुकीसाठी त्याचा चांगला परिणाम दिसून आला असला तरीही त्यातून गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा धाक निर्माण करण्यात मात्र त्यांना पूर्णतः अपयश आल्याचेच मंगळवारच्या घटनेतून सिद्ध झाले आहे. या प्रकरणाचा तपास जिगरबाज पोलीस उपनिरीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून या गुन्ह्याची उकल होते का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

इतक्या मोठ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी अवघे 57 पोलीस कर्मचारी असल्याने शहरात ‘रामराज्य’ निर्माण होणे दिवास्वप्नं ठरेल, मात्र जेव्हा पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच सोनसाखळ्या लांबविण्यासारख्या घटना घडू लागतात तेव्हा, समाजातील अपप्रवृत्ती शिरजोर झाल्याचे आणि पोलिसांचा त्यांच्यावरील धाकच नाहीसा झाल्याचे दर्शवितात. सदरची घटना पोलिसांच्या नाकावरच टिच्चून घडली आहे. या माध्यमातून चोरट्यांनी शहर पोलिसांनाच थेट आव्हान दिले आहे, पोलीस हे आव्हान कसे पेलतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

