पेन्शन संघर्ष यात्रेचे संगमनेरमध्ये दणक्यात स्वागत पंचायत समिती ते सिद्धीविनायक लॉन्स काढला मशाल मार्च

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत जुनी पेन्शन संघर्ष समितीने सोमवारी आझाद मैदानातून सुरू केलेली पेन्शन संघर्ष यात्रा गुरुवारी (ता.25) संगमनेर येथे येऊन धडकली. पंचायत समिती ते सिद्धीविनायक लॉन्स असा मशाल मार्च काढत सुमारे पाचशे कर्मचारी पदयात्रेत सामील झाले होते.

यावेळी आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अरुण जोर्वेकर होते तर प्रमुख पाहुणे ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे होते. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वात हा पेन्शन संघर्ष मार्च नाशिकहून संगमनेर येथे दाखल झाला, त्यांनीच संपूर्ण पेन्शन संघर्ष यात्रेचे संचलन करण्याचे मान्य करत शासनाकडे यंदाच्या अधिवेशनात प्रश्न मांडून कर्मचार्‍यांच्या पदरात पेन्शन देण्याची मागणी करण्याचे आश्वासन दिले.

महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर, 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन बंद करून तिला पर्याय म्हणून राज्य सरकारची डीसीपीएस/एनपीएस योजना सुरु केली आहे. या नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचार्‍यांच्या वेतनातील रक्कम बाजारात विविध कंपन्यामध्ये गुंतवून त्यातून कर्मचार्‍यांना पेन्शन देण्याचे धोरण आहे. मात्र मागील 16 वर्षांतील या डीसीपीएस/एनपीएस योजनेचे स्वरूप बघता ही योजना फसवी असून त्यातून कर्मचार्‍यांना जुनी पेन्शनप्रमाणे निवृत्तीवेतन मिळताना दिसत नाही. ज्यामुळे मागील 16 वर्षांत मयत किंवा सेवानिवृत्त झालेले असंख्य कर्मचारी व त्यांचे परिवार कोणत्याही पेन्शनपासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या सेवेसाठी आपले पूर्ण आयुष्य अर्पण करणार्‍या कर्मचार्‍यावर अशी वेळ येणे निंदनीय आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर, 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचार्‍यांना जुन्या पेन्शन योजनेचे लाभ पूर्ववत लागू करावे अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व संघटना मागील पंधरा वर्षांपासून विविध आंदोलने करून करत आहेत. मात्र शासनाने आश्वासने देऊन वेळोवेळी कर्मचार्‍यांची फक्त फसणूकच केली आहे. त्यामुळे शासनाविषयी कर्मचार्‍यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

या यात्रेत आमदार डॉक्टर सुधीर तांबे, पेन्शन संघर्ष यात्रेचे राज्य समन्वयक वितेश खांडेकर, समन्वयक मधुकर काठोळे, प्राजक्त झावरे, आशुतोष चौधरी, गोविंद उगले, ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, लिपीकवर्गीय संघटनेचे राज्य सरचिटणीस अरुण जोर्वेकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नागणे, डॉ. संजय कळमकर, बापूसाहेब तांबे, आबासाहेब जगताप, राजेंद्र निमसे, माधव हासे, गौतम मिसाळ, कल्याण लवांडे, प्रवीण ठुबे, सीताराम सावंत, किसन खेमनर, राजू रहाणे, सुखदेव मोहिते, शिवाजी दुशिंग, वृषाली कडलग, अंजली मुळे, राजेंद्र ठोकळ, बाजीराव मोढवे, योगेश थोरात, शिवाजी आव्हाड, सचिन गांडोळे, विकास खेबडे, गणेश शेंगाळ, दत्ता आंबरे, अशोक मधे, रावसाहेब शिंदे, बाळासाहेब इदे, संजय साबळे, सोमनाथ पोंदे, केशव बाळसराफ, शरद गवारी, किसन अडांगळे, विकास साठे, श्रीकांत साळवे, रवींद्र धाकतोडे, संतोष झावरे आदी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन योगेश थोरात तर आभार प्रदर्शन अशोक साळवे यांनी केले.

Visits: 4 Today: 1 Total: 27347

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *