संगमनेरच्या ‘अजब’ प्रेमप्रकरणाने विवाह संस्कारांचे वाभाडे! शिक्षणाच्या नावाखाली पुण्यात स्वैराचार; ‘नात्या’तली वीण उसवली की संस्कारांची शिदोरी संपली?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतात विवाह हा केवळ कायदेशीर करार नसून तो एक पवित्र ‘यज्ञ’ मानला जातो. मात्र, संगमनेर तालुक्याच्या पठारभागातून समोर आलेल्या एका घटनेत या पवित्र यज्ञाच्या समिधाच जळून खाक झाल्या आहेत की काय, अशी भीती वाटू लागली आहे. पुण्यात शिक्षणासाठी गेलेल्या एका तरुणीने चक्क आपल्याच चुलत भावाशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे कृत्य जितके लाजीरवाणे आहे, त्याहूनही भयानक म्हणजे मुलीला सावरण्यासाठी गेलेल्या जन्मदात्या पित्याला मुलाच्या कुटुंबीयांनी कुर्हाड दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेने केवळ पठारभागच नव्हे, तर प्रत्येक पालकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडले असून चुलत भावासोबतच अनैतिक संबंध निर्माण करुन संसार थाटण्याच्या या प्रकाराने जिल्हा सून्न झाला आहे.

महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात विश्वात्मक देवाकडे जे मागणं मागितलं, त्यात ‘परस्परे पडो मैत्र जीवांचे’ असे म्हटले आहे. पण हे मैत्र पवित्र असावे, असा त्याचा मतितार्थ होता. विवाहाच्या बाबतीत संत तुकाराम महाराजांनी ‘कन्या सासुर्यासी जाये, मागे परतोनी पाहे’ अशा शब्दांत लेकीच्या विरहाचे आणि नात्याच्या जबाबदारीचे वर्णन केले आहे. मात्र, आजच्या पिढीला रक्ताच्या नात्याची ‘मर्यादा’ ओलांडताना संतांच्या या शिकवणुकीचा विसर पडला आहे. रक्ताच्या नात्यातच अनैतिकतेचे विष कालवले जात असेल, तर समाजाचा डोलारा कसा सावरणार, हा यक्षप्रश्न यातून उभा ठाकला आहे.

आज ग्रामीण भागातील तरुण पिढीला शहरांचे प्रचंड आकर्षण आहे. उच्च शिक्षणासाठी मुले शहरात जातात, तिथे त्यांना मिळणारे अफाट स्वातंत्र्य आणि पालकांचा तुटलेला संपर्क हे अशा घटनांचे मूळ ठरत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांवर आजी-आजोबांचा धाक उरला नाही. घरातून मिळणारी संस्कारांची शिदोरी संपत असल्याने बाहेरच्या जगात ‘स्वैराचाराला’ प्रेम समजण्याची चूक आजची तरुण पिढी करत आहे. पठारभागातील या मुलीने आपल्या बापाच्या कष्टाची आणि कुळाच्या प्रतिष्ठेची होळी करुन आधुनिकतेचा कोणता आदर्श समोर ठेवला आहे? असा प्रश्नही या घटनेने उभा केला आहे.

आजच्या या ‘हायटेक’ युगात स्मार्टफोन म्हणजे जग झाले आहे. ‘रिल्स’ आणि पाश्चात्य ‘वेब’ सिरीजमधून दाखवली जाणारी अनैतिकता आजच्या तरुणाईला ‘कुल’ वाटते. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करताना आपण आपल्या मुळांनाच सुरुंग लावत आहोत. डिजिटल उपकरणांच्या अमर्याद वापरामुळे माणसे जवळ आली, पण मनातील ओलावा आणि नात्यांची शुद्धता मात्र संपली आहे हेच या घटनेतून अधोरेखीत होत आहे.

या घटनेत सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्या मुलीच्या वडिलांची हतबलता. पोटच्या गोळ्याला संस्कारांच्या वाटेवर आणण्यासाठी गेलेल्या पित्याला मुलाच्या घरच्यांनी ज्या प्रकारे वागणूक दिली, ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे. ‘मुलगी आमच्या घरची सून आहे, पुन्हा आला तर कुर्हाडीने तुकडे करु’, ही भाषा कोणत्या संस्कृतीत बसते?. दुर्दैवी पित्याच्या तक्रारीवरुन घारगाव पोलिसांनी शिवीगाळ व धमकीचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीररीत्या सज्ञान मुला-मुलींच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्यास कायद्यालाही मर्यादा आहेत. पण जीथे कायदा संपतो, तीथे नैतिकतेची जबाबदारी सुरु होते, त्याचे काय? याचा मात्र कोठेही लवलेश नसल्याचे चित्र आता सर्रास दिसू लागले आहे. या घटनेने प्रत्येक पालकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडले असून चुलत भावासोबतच अनैतिक संबंध निर्माण करुन संसार थाटण्याच्या या प्रकाराने जिल्हा सून्न झाला आहे.

संगमनेरच्या या घटनेने ढासळत असलेल्या समाज व्यवस्थेचे आणि परंपेरचे वास्तव चित्र उभे केले आहे. आपण आजही आपल्या मुलांशी संवाद साधला नाही, त्यांना आपल्या परंपरा आणि आधुनिकता यातील सीमारेषा समजावून सांगितल्या नाहीत, तर भविष्यात रक्ताच्या नात्यांची कोणतीही ओळख उरणार नाही. आपण आज आधुनिकतेची कास पकडून प्रगतीकडे जात आहोत की अधोगतीकडे, याचा विचार करण्याची वेळ आता प्रत्येक पालकावर आणि सुजाण नागरिकावर आली आहे.

