राहुरी तहसील कार्यालयातून कोर्या शिधापत्रिकांची चोरी
राहुरी तहसील कार्यालयातून कोर्या शिधापत्रिकांची चोरी
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याच्या आवारातून यापूर्वी पकडलेल्या वाळूच्या गाड्या, त्यांच्या बॅटर्या, टायर चोरी गेल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र आता पुरवठा शाखेतील कपाटांची कुलूपे तोडून कोर्या केशरी रंगाच्या 70 शिधापत्रिका चोरीला गेल्याने तहसील कार्यालयाच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाणे व तहसील एकाच आवारात असूनही चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पुरवठा शाखेतील कर्मचारी भारती सुनील पडदुणे यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे कि, 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान अज्ञात चोरट्याने 1400 रुपये किंमतीच्या 70 कोर्या केशरी रंगाच्या शिधापत्रिका चोरुन नेल्या आहेत. यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 380, 454, 457 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पोलीस नाईक दिवटे यांना पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत. चोरी करण्यापूर्वी चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेर्याची केबल बाहेरुन कट केल्याने चोरटा बाहेरचा नसून पुरवठा विभागाची माहिती असणारा असल्याची चर्चा आता नागरिकांत सुरू आहे.