साकूरमध्ये अल्पवयीन मुलींची दोघांकडून छेडछाड… घारगाव पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक..

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील पठारभाग पुन्हा एकदा हादरला आहे. अल्पवयीन मुली घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी छेड काढत एका अल्पवयीन मुलीच्या भावास शिवीगाळ व दमदाटी करुन धमकी दिल्याची घटना मंगळवारी (ता.9) सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास साकूरमधील मारुती मंदिराजवळ घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी दोघांविरोधात विविध कलमांसह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अल्पवयीन विद्यार्थिनी घरी जाण्यासाठी जांबूर रस्त्याने चालल्या होत्या. या दरम्यान संतोष शिवाजी बर्डे (रा.मांडवे बु.) व आदिक किसन कुदनर (रा.शिंदोडी) हे दुचाकीवर आले. त्यांनी दोघींभावेती घिरट्या मारत शिट्ट्या मारल्या. यावरही न थांबत सोबत येण्यास सांगितले. त्यावर मुलींनी त्यांना ‘तुम्ही येथून निघा, लई शहाणे झाले का?’ असे म्हणूनही ते निघून गेले नाही. त्याचवेळी एका मुलीचा भाऊ त्यांना घेण्यासाठी आला. त्यावेळी मुलींनी त्याला हे दोघे छेडछाड करत असल्याचे सांगितले. त्यावर त्याने दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी त्याचे काहीही न ऐकता उलट त्यालाच शिवीगाळ व दमदाटी करुन ‘तुझे हातपाय तोडून पोत्यात घालून घरी घेऊन जाऊ’ अशी धमकी दिली.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन संतोष बर्डे व आदिक कुदनर यांच्याविरोधात घारगाव पोलिसांनी गु.र.नं. 32/2021 भादंवि कलम 354 (ड), 504, 506, 34 सह बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत हे करत आहे.

कोरोना संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. आता कुठे चालू झाले तर मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थिनींनी खबरदारी घेण्याची गरज आहे. आणि पोलिसांनी देखील टारगटांचा बंदोबस्त करुन विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

Visits: 14 Today: 2 Total: 115494

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *