संगमनेरच्या ‘राजें’चा मुख्यमंत्र्यांना सवाल; ‘हेची फळ काय मम तपाला?’! रेल्वेमार्ग बदलल्याने निष्ठावंतांमध्ये खद्खद्; संघर्षाचा विसर पडल्याची जळजळीत भावना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या चार दशकांपासून अवघ्या उत्तर महाराष्ट्राला आशा लागून असलेल्या ‘नाशिक-पुणे’ रेल्वेमार्गावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा रेल्वेमार्ग अचानक अहिल्यानगरकडे वळवण्याच्या निर्णयाला अन्य राजकीय पक्षांसह आता भाजपच्या गोटातूनही विरोध होवू लागला असून, स्थानिक भाजपचे ज्येष्ठ नेते आणि निष्ठावंत कार्यकर्ते अ‍ॅड.सदाशिवराजे थोरात यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. अतिशय परखड शब्दात लिहिलेल्या या पत्रातून सदाशिवराजांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या असून पक्षासाठी चार दशकं अहोरात्र संघर्ष करण्याच्या आमच्या तपाचे हेच फळ आहे का? असा जळजळीत सवालही उपस्थित केला आहे. या पत्रातून त्यांनी हा प्रकल्प अविकसित तालुक्यांचा कायाकल्प करणारा ठरु शकतो, त्यामुळे आपण जातीने या विषयात लक्ष घालावे असे साकडेही मुख्यमंत्र्यांना घातले आहे. त्यांच्या या पत्राला ‘सीएमओ’ कसा प्रतिसाद देते याबाबत आता उत्कंठा दाटत आहे.


नाशिक-पुणे रेल्वेमार्ग केवळ रेल्वेचा प्रकल्प नसून तो या भागातील शेतकरी, कष्टकरी आणि युवकांच्या भवितव्याचा विषय आहे. या मार्गासाठी जमिनी संपादित झाल्या, लोकांच्या पदरात नुकसान भरपाई पडली, मात्र आता ऐनवेळी मार्ग बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्याने संगमनेरसह सिन्नर, चाकण आणि राजगुरुनगर पट्ट्यातील कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याची भावना आहे. हीच भावना सदाशिवराजे थोरात यांनी आपल्या पत्रातून ‘राजकीय आरसा’ दाखवत मुख्यमंत्र्यांपुढे मांडली आहे.


अ‍ॅड.सदाशिवराजे थोरात हे मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक सरदार घराण्याचा वारसा लाभलेले आणि जनसंघापासून भाजपशी एकनिष्ठ राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणून तालुक्यात ओळखले जातात. संगमनेरात अत्यंत आदराने ‘राजे’ म्हणून संबोधल्या जाणार्‍या थोरातांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या आपल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही 40 वर्षे अटलजी, अडवाणीजी आणि मुंडे साहेबांच्या विचारांसाठी विरोधकांचे दगड खाल्ले, शिव्या सोसल्या.. मात्र आज आपल्याच कल्पनेतील, आपल्याच विकासाचे प्रकल्प जर आपल्याच सत्ताकाळात रद्द होत असतील किंवा बदलले जात असतील, तर लोकांपुढे कोणत्या तोंडाने जावे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


पुणे-मुंबई दरम्यानच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च असलेल्या भूमिगत रेल्वे प्रकल्पांना गती मिळते, मग नाशिक-पुणे रेल्वेमार्गाबाबतच टाळाटाळ कशासाठी असा सवाल राजेंनी विचारला आहे. नाशिक-पुणे हे दोन तासांचे अंतर केवळ प्रवाशांसाठी सोयीचे नाही, तर ते औद्योगिक विकासासाठीही महत्त्वाचे आहे. सिन्नर तालुका रेल्वे मागणी कृती समितीने आज (ता.31) या मागणीसाठी समृद्धी महामार्ग आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचे मोठे आंदोलन पुकारले होते. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलन स्थगित असले तरी समितीने आपला लढा तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.


जून्या प्रस्तावित रेल्वेमार्गावरील खासदार आणि आमदार सातत्याने मागणी करत असूनही केंद्र व राज्य स्तरावर समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने मूळचा भाजप कार्यकर्ताच आता हतबल झाला आहे. हीच हतबलता सदाशिवराजे थोरात यांच्या पत्रातील ‘हेची फळ काय मम तपाला?’ या ओळीतून अधोरेखित झाली आहे. पक्षवाढीसाठी आयुष्य खर्ची घालणार्‍या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने पत्राद्वारे आता थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातल्याने त्यांच्याकडून या प्रकल्पाकडे केवळ तांत्रिक अडचण म्हणून पाहीले जाते की, आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत या भागाच्या विकासाचे दार उघडले जाते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.


अ‍ॅड.सदाशिवराजे थोरात केवळ राजकारणी नसून ते शहरातील ज्येष्ठ कायदेविषयक सल्लागार आणि राष्ट्रीय जलतरणपटूही आहेत. संघ आणि भाजपच्या मूशीत घडलेल्या सदाशिवरावांनी जेव्हा आपल्याच सरकारविरुद्ध लेखणी उपसली आहे, तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घेणेही सरकारला भाग पडणार आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमूळे या विषयावरुन प्रस्तावित असलेली आंदोलने थांबली असली, तरीही राजेंनी उपस्थित केलेला ‘हेची फळ काय मम तपाला?’ हा प्रश्न आता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात घर करु लागला असून या पत्रातून सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांनाही बळ मिळाले आहे.

Visits: 3 Today: 3 Total: 1411578

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *