श्रीरामपूर पालिकेलाच माहिती नाही कोरोना बळींची संख्या! मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीतून धक्कादायक प्रकार उघडकीस

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरात कोरोनामुळे नेमक्या किती रुग्णांचा मृत्यू झाला, याची माहिती नगरपालिकेकडे नाही. हा प्रकार मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीत उघडकीस आला. त्यामुळे समिती सदस्यांनी नगरपालिका प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. याची दिवसभर शहरात चर्चा रंगली होती.

सहाय्यक गटविकास अधिकारी एस. आर. दिघे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची तिसरी बैठक नुकतीच पार पडली. बैठकीस सदस्य मिलिंद साळवे, बाळासाहेब जपे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजश्री देशमुख, पंचायत समितीच्या प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी आशा लिप्टे, दीपाली भिसे, पी. एम. करंदीकर, एस. एन. पीरजादे, एम. जी. दुरगुडे, हरीश पैठणे उपस्थित होते. लिप्टे यांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांनी बालसंगोपन योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यानुसार अंगणवाडी सेविकांकडून आत्तापर्यंत तालुक्याच्या ग्रामीण भागात सर्वेक्षण केल्यानंतर 0 ते 18 वयोगटातील बालकांचे 133 प्रस्ताव बालसंगोपन योजनेसाठी तयार केल्याचे सांगितले.

ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांनी तब्बल 133 बालकांचे बालसंगोपन योजनेसाठीचे प्रस्ताव तयार केले आहेत. त्याचे एकीकडे कौतुक करण्यात आले. मात्र दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांत शहरात कोरोनाने किती रुग्णांचा मृत्यू झाला, याची माहिती नसल्याचा प्रकार उघडकीस आला. नगरपालिकेकडे केवळ स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेल्या कोरोना रुग्णांचीच माहिती आहे. शहरात अनेकांचा कोरोनावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची आकडेवारी पालिकेत नसल्याने शहरातील एकूण किती नागरिक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले, याची आकडेवारी उपलब्ध नसल्याचा आरोप साळवे यांनी केला. एकल महिलांचीही अद्याप माहिती नगरपालिकेकडे नसल्याने या वेळी उपस्थित समितीच्या सदस्यांनी संताप व्यक्त केला. नगरपालिकेने महामारीच्या काळात जबाबदारीने नियोजन करणे गरजेचे होते.
