संगमनेरात ‘सेवा’ दवाखान्यासह ‘शाखा’ कार्यालय! आमदार अमोल खताळ यांची माहिती; कामगारांना स्थानिक पातळीवरच सुविधा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कामगारांची मागणी विचारात घेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून संगमनेरात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या ‘सेवा’ दवाखान्यासह ‘शाखा’ कार्यालयालाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सभासदांना स्थानिक पातळीवर उपचारांसह आता त्यांचे सर्वप्रकारचे वैद्यकीय दावेही संगमनेरातच दाखल करता येणार आहेत. या सुविधेमुळे हजारो कामगारांचा जिल्ह्याच्या मुख्यालयात होणारा हेलपाटा आता वाचणार असून त्यासाठी खर्ची होणार्या वेळेसह पैशांचीही बचत होणार आहे. कामगारांना आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी आपण नेहमीच आग्रही राहीलो असून संगमनेरात संलग्न शाखा कार्यालय सुरु करण्याचा निर्णय खूप समाधान देणारा असल्याचे भावोद्गार आमदार अमोल खताळ यांनी दैनिक नायकशी बोलताना व्यक्त केले. निवडणुकीदरम्यान आपण याबाबतचा ‘शब्द’ दिला होता, त्याची पूर्ती झाल्याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली.

चार वर्षांपूर्वी 1 नोव्हेंबररोजी अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश कर्मचारी राज्य विमा योजनेच्या अंमलबजावणी क्षेत्रात करण्यात आला. जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात संगमनेर तालुका नेहमीच आघाडीवर राहीला आहे. त्यामुळे जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरु होताच शहरातील पाच हजारांहून अधिक कामगारांनी नावनोंदणी केली. त्या माध्यमातून वार्षिक दोन कोटी रुपयांची वर्गणीही महामंडळाकडे जमा होते. दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात योगदान देवूनही महामंडळाचा सेवा दवाखाना व शाखा कार्यालय मात्र जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असल्याने पात्र असूनही त्याचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना मोठे परिश्रम आणि खर्च करावा लागत होता. याबाबत विधानसभा निवडणुकीदरम्यान स्थानिक सभासद कामगारांनी हा विषय समोर आणल्यानंतर प्राधान्याने तो सोडवण्याचा ‘शब्द’ आपण त्यांना दिला होता अशी आठवण त्यांनी सांगितली.

या संदर्भात मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांच्याशीही चर्चा केली होती. त्यांनी या योजनेत एकट्या त्यांच्या उद्योगातील दोन हजारांहून अधिक कामगारांचा समावेश असल्याचे व या सर्वांनी गेल्या चार वर्षात साडेतीन कोटी रुपयांहून अधिक योगदान जमा केल्याची माहिती दिली. असे असतानाही या योजनेचा लाभ घेण्यात मात्र मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याची गोष्ट त्यांनीही निदर्शनास आणून देताना जिल्ह्यात इतकी मोठी सभासद नोंेदणी असलेल्या शहरात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या सेवा दवाखान्यासह महामंडळाकडून देण्यात येणार्या विविध वैद्यकीय व आर्थिक सुविधा मिळवण्यात वेळ व पैशांचा अपव्यय होत असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिल्याचे आमदार खताळ यांनी यावेळी सांगितले.

यापूर्वी नियोक्ता आपल्या कर्मचार्यांची वैद्यकीय खर्चाची परतफेड करायचा, मात्र जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या नियमांची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर त्यांना तो निधी आता महामंडळाकडे (ई.एस.आय.सी) जमा करावा लागतो. काही आस्थापनांकडून आपल्या कर्मचार्यांच्या वैद्यकीय विम्याचे हप्ते भरले जात, त्यापोटी त्यांच्या कर्मचार्यांना स्थानिक रुग्णालयातच कॅशलेस सेवांचा लाभ मिळायचा. मात्र या गोष्टींही थांबल्याने कर्मचार्यांना महामंडळाच्या रुग्णालयांशिवाय पर्यायच राहीला नव्हता. त्यातही संगमनेरात महामंडळाचे शाखा कार्यालयही नसल्याने सभासद कर्मचार्यांना त्यांचे आजारपण, अपघात, प्रसूती, वैद्यकीय प्रतिपूर्ती, नुकसान भरपाई, अंत्यविधी, नियमित आरोग्य तपासण्या अशा कितीतरी वेगवेगळ्या खर्चांचे दावे सादर करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

यापूर्वी अशाप्रकारचे दावे सादर करण्यासाठी अहिल्यानगरला जावे लागायचे. त्यासाठी प्रवास खर्चासह कामावरुन रजा घ्यावी लागत असल्याने कर्मचार्यांना आर्थिक झळ बसायची. त्यातही दाखल केलेल्या प्रस्तावात काही त्रूटी आढळून आल्यानंतर होणार्या वारंवारच्या हेलपाट्यामूळे अनेकजण या योजनेसाठी नोकरीच्या पहिल्या दिवसापासून पात्र असूनही ती मिळवण्याचा आटापीटा नको म्हणून स्वतःला त्यापासून वंचित ठेवत होते. यासर्व गोष्टींचा विचार करुन, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, योजनेचे लाभार्थी, उद्योजक अशा सगळ्यांशी चर्चा करुन या संदर्भात राज्याचे कामगार मंत्री आकाश फूंडकर यांच्यासोबत गेल्यावर्षी 4 फेब्रुवारी 2025 रोजी सविस्तर चर्चा करुन त्यांना पत्र सादर केले. त्यावर त्यांनी तात्काळ कारवाई करताना विभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आणि संगमनेरातील हजारों कामगारांची गेली चार वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली, याचे मनस्वी समाधान असल्याची भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली.

‘ई.एस.आय.सी’ किंवा ‘कर्मचारी राज्य विमा महामंडळ’ ही भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे. संघटीत क्षेत्रातील सदस्य कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचार (बाह्य आणि अंतर्गत विभाग), आजारपणाच्या कालावधीत भत्ता, महिला कर्मचार्यांना प्रसूती रजेचा आणि अन्य आर्थिक लाभ, कामावर असताना अपघात किंवा आजारपणातून अपंगत्व आल्यास पेन्शन अथवा आर्थिक मदत आणि कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना त्याचा लाभ दिला जातो. यासाठी महामंडळाकडून सेवा दवाखाने चालवले जातात. मोठ्या वैद्यकीय उपचारांसह अन्य लाभ मिळवण्यासाठी शाखा कार्यालय असते. संगमनेरसाठी ते अहिल्यानगरला कार्यरत आहे. तेथे प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यावर मंजुरीची प्रक्रिया सुरु होते, दाखल प्रस्तावात त्रूटी अथवा कागदपत्रांची अपूर्तता राहील्यास वारंवार मुख्यालयाचे हेलपाटेही मारावे लागतात. यासर्व गोष्टी थांबणार असून कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या सभासद असलेल्या हजारों लाभार्थ्यांना आता संगमनेरातच ‘सेवा’ दवाखाना आणि ‘शाखा’ कार्यालय या दोन्ही गोष्टींचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हजारों कामगार व त्यांच्या कुटुंबियांची परवडही थांबणार आहे.

