पाठलाग करत गोवंश जनावरांची पिकअप आंबीफाट्यावर पकडली

पाठलाग करत गोवंश जनावरांची पिकअप आंबीफाट्यावर पकडली
घारगाव पोलिसांची कारवाई; तिघांविरोधात गुन्हा, 4 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
नायक वृत्तसेवा, घारगाव
कत्तलखान्यांच्या बातम्यांनी कायमच चर्चेत असलेले ‘संगमनेर’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आळेफाट्याहून संगमनेरला गोवंश जनावरे घेऊन येणार्‍या पिकअपचा थरारक पाठलाग करुन घारगाव पोलिसांनी आंबीफाट्यावर गुरुवारी (ता.24) 4 वाजेच्या सुमारास पकडली. यावेळी पिकअपची तपासणी केली असता लहान-मोठी अठ्ठावीस वासरे आणि दोन गायी मिळून आल्या तर ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने संगमनेरात घेऊन जात असल्याची धक्कादायक कबुलीही पिकअप चालकासह इतर दोघा तरुणांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी 4 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तिघांवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांना खबर्‍याकडून पांढर्‍या रंगाच्या पिकअपमध्ये गायी-वासरे आळेफाट्याहून संगमनेरला कत्तलीसाठी जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस नाईक आर. ए. लांघे यांना बोलावून दोन पंचासमक्ष संपूर्ण हकीगत समजावून सांगत छापा मारण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलीस नाईक लांघे यांनी इतर सहकार्‍यांसमवेत घारगाव बसस्थानकावर थांबले. यावेळी माहितीनुसार पांढर्‍या रंगाची पिकअप आळेफाट्याहून संगमनेरच्या दिशेने जाताना दिसली. तिचा थरारक पाठलाग करुन आंबीफाट्यावर पकडली. यावेळी पिकअपची (क्र.एमएच.14, एझेड.4810) पाहणी केली असता पोलिसांना वेगवेगळ्या वयाची लहान-मोठी गोवंश जनावरे दिसून आली. याबाबत पिकअप चालकास पंचासमक्ष विचारणा केली असता ही सर्व जनावरे विना परवाना बेल्हे येथून विकत घेऊन संगमनेरला कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.


या प्रकरणी घारगाव पोलिसांत पोलीस कर्मचारी प्रमोद चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पिकअप चालक प्रशांत मारुती नाईकवाडी (वय 20, रा.बेल्हे, पिंगटआळी), हासनैन जावेद कुरेशी (वय 19, रा.खालचीमाळी, बेल्हे) व रमजान युसूफ चौगुले (वय 22, रा.पेठआळी, बेल्हे) या तिघांविरोधात गुरनं.348/2020 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 सुधारित कायदा कलम 1995चे कलम 5 अ, ब व पशु क्रूरता अधिनियम 1995चे कलम 11 अ, ड, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, 3 लाख रुपयांची पिकअप, 20 हजार रुपये किंमतीच्या दोन जर्सी गायी आणि 84 हजार रुपये किंमतीची लहान-मोठी 28 वासरे असा एकूण 4 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर. ए. लांघे हे करत आहे.

Visits: 36 Today: 1 Total: 435696

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *