‘पर्व’ संपले.. ‘झंझावात’ थबकला! ‘अजित पवार’ नावाचे धाडस थांबले; महाराष्ट्रावर नियतीचा क्रूर घाला..

श्याम तिवारी, संगमनेर
महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर गेल्या साडेतीन दशकांपासून धगधगते ‘अग्निकुंड’ म्हणून तळपणारे नेतृत्व, प्रश्नांची तड लावणारा ‘दादा’ आणि राज्याच्या प्रशासनावर आपला वचक ठेवणारा एक अष्टपैलू ‘लोकनेता’ आज अपघाती निर्वतला. आज सकाळी बारामतीजवळ झालेल्या खासगी विमानाच्या भीषण अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना म्हणजे केवळ एका नेत्याची अकाली एक्झिट नसून, महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणि राजकारणातील धाडसाच्या एका संपूर्ण ‘अध्याया’चा अंत झाला आहे. आज सकाळी ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्याच्या डोळ्यातून अश्रूंना वाटा फूटल्या. देशाच्या राष्ट्रपतींपासून ते सामान्य शेतमजूरापर्यंत प्रत्येकाला ‘हुंदका’ देणार्‍या या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘अजित पवार’ नावाच्या पर्वाचा झंझावातही थबकला.

आजची सकाळ महाराष्ट्रासाठी नेहमीसारखीच उजाडली होती. मंत्रालयाचे कामकाज, बारामतीकडे जाण्याची लगबग आणि राजकारणातील डावपेच नेहमीप्रमाणे सुरु होते. मात्र, सकाळी नऊच्या सुमारास बारामतीजवळ विमानाचा अपघात झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण राज्याचा श्वास रोखला गेला. ज्या नेत्याने आपल्या आयुष्यात अनेक राजकीय वादळांना अंगावर घेतले, तो ‘झंझावात’ एका तांत्रिक बिघाडासमोर शांत झाला. घटनास्थळावरील विदारक दृष्य पाहून दगडालाही पाझर फुटेल अशी स्थिती होती. राज्याच्या सत्तेचा केंद्रबिंदू असलेला हा नेता असा अचानक निघून जाईल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाचे विश्लेषण करायचे झाले, तर ‘धाडस’ हा शब्द त्यांच्या ठायी ठासून भरलेला होता. ते केवळ शरद पवार यांचे पुतणे म्हणून राजकारणात स्थिरावले नाहीत, एका वटवृक्षाच्या छायेत राहून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे अवघड आहे, हे त्यांनी जाणले होते. त्यातूनच त्यांनी काका शरद पवार यांचा हात सोडून स्वतःची स्वतंत्र राजकीय चूल मांडण्याचे धाडस दाखवले, त्यांची ही कृती भारतीय राजकारणाच्या इतिहासात अत्यंत दुर्मिळ मानली जाते. त्यांचा हा निर्णय केवळ सत्तेचा मोह नव्हता, तर ती स्वतःची कार्यपद्धती सिद्ध करण्याची जिद्द होती. आता मी सज्ज आहे आणि मी हे करुन दाखवू शकतो, हा विश्वास त्यांच्या प्रत्येक हालचालीतून झळकायचा. त्यांनी घेतलेले बंडखोरीचे निर्णय केवळ राजकीय नव्हते तर ती, एका कणखर नेतृत्वाच्या उदयाची नांदी होती.

अजितदादांच्या अष्टपैलू आणि ‘अनप्रेडिक्टेबल’ राजकारणाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे 23 नोव्हेंबर 2019 ची ‘ती’ पहाट. जेव्हा अवघा महाराष्ट्र गाढ झोपेत होता, तेव्हा राजभवनात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सत्तेची सर्व समीकरणे उलथवून लावली होती. त्या एका घटनेने दादांनी हे सिद्ध केले की, ते राजकारणातील असे खेळाडू आहेत ज्यांच्या चालींचा अंदाज मोठमोठ्या चाणक्यांनाही लावता येत नाही. जरी ते सरकार फार काळ टिकले नाही, तरीही त्या धक्क्याने दादांची ‘किंगमेकर’ म्हणून निर्माण झालेली प्रतिमा जनमानसात कायमची कोरली गेली.

अजित पवार म्हणजे ‘हो’ ला ‘हो’ आणि ‘नाही’ ला ‘नाही’ म्हणणारा स्पष्टवक्ता राजकारणी. प्रशासनावर असलेला त्यांचा वचक आज मात्र दंतकथा बनला आहे. मंत्रालयातील अधिकार्‍यांच्या मनात दादांची धास्ती होती, ती त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे. पहाटे पाचच्या ठोक्याला जनतेच्या गाठीभेटी आणि सात वाजता मंत्रालयातील पहिली बैठक, हा त्यांचा दिनक्रम अचंबित करणारा होता. फाईलवर सही झाली म्हणजे काम झालेच पाहिजे, हा दादांचा खाक्या होता. नियम आणि अटींच्या कचाट्यात अडकलेल्या लोकांसाठी दादा म्हणजे आशेचा किरण असायचे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याचा खजिना ज्या पद्धतीने सांभाळला, ते पाहून अनेक अर्थतज्ज्ञही थक्क व्हायचे. प्रत्येक अर्थसंकल्पात आकडेवारी त्यांच्या जिभेवर असायची आणि प्रश्नांची उत्तरं त्यांच्या बोटावर.

आपले गृहशहर असलेल्या बारामतीला जागतिक दर्जाचे शहर आणि शैक्षणिक हब बनवण्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. पण, त्यांचे कार्य केवळ बारामतीपुरते मर्यादित नव्हते. संगमनेर असो किंवा गडचिरोली, राज्याच्या प्रत्येक कोपर्‍यातील विकासाच्या प्रश्नावर त्यांची पकड होती. उत्तर महाराष्ट्रातील सिंचनाचे प्रश्न असोत किंवा सहकार क्षेत्रातील अडचणी, दादांनी नेहमीच मदतीचा हात दिला. त्यांच्या जाण्याने आज सहकारी चळवळीचा एक मोठा आधारवड कोसळला आहे.

दादांचे राजकारण शब्दांच्या खेळातले नव्हते, तर ते कृतीचे होते. त्यांनी कधीही वेळकाढूपणा केला नाही. त्यांच्याकडे न्याय्य काम घेवून येणारा माणूस कधीही रिकाम्या हाताने परत जात नव्हता. त्यांची भाषणे अलंकारिक असण्यापेक्षा अधिक वास्तववादी असायची. ‘मी जे बोलतो, ते करतो’ हा त्यांचा शब्द महाराष्ट्रातील जनतेने अनेकदा प्रत्यक्ष अनुभवलाही आहे. अजितदादा असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते, जे शेतातल्या बांधावर जेवढ्या सहजतेने शेतकर्‍याशी संवाद साधायचे, तेवढ्याच ताकदीने विधानसभेत विरोधकांना निरुत्तर करायचे. सत्तेत असो वा विरोधात, त्यांचा शब्द हा नेहमीच अंतिम मानला गेला.

आज अजित पवार आपल्यात नाहीत, हे वास्तव स्वीकारणे महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण आहे. सह्याद्रीचा हा बुलंद कणा कोसळल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ती येणारी अनेक दशके भरुन निघणार नाही. एक धुरंधर राजकारणी, दूरदृष्टीचा निर्माता आणि धाडसाचे चालते-बोलते प्रतीक आज विसावले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक नेते आले आणि गेले, पण ‘दादा’ हे नाव लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ठरले. त्यांच्या रोखठोक स्वभावाचे चटके अनेकांना बसले असतील, पण त्यांच्या कामाचा झपाटा सर्वांसाठीच कौतुकाचा विषय होता.

ज्या धडाडीने त्यांनी आयुष्य जगले, त्याच धडाडीने ते नियतीसमोर झुकले. आज बारामतीचे आकाश ढगाळलेले आहे, सह्याद्रीचे कडे हळहळत आहेत आणि मंत्रालयाची दालनं सुन्न झाली आहेत. एका झंझावाताचा असा क्रूर अंत होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. अजितदादा, आपण आपल्या कृतीने, शब्दाने आणि कर्तृत्वाने महाराष्ट्राला जे दिले, ते कधीही विसरता येणार नाही. आपल्या रुपाने महाराष्ट्राने आज खरा ‘जननायक’ गमावला आहे. आपल्या दुर्दैवी निधनाने आपले पर्व संपले असले, तरी तुमच्या कामाचा झंझावात महाराष्ट्राच्या विकासाच्या रुपाने सदैव धडधडत राहील.

कठोर प्रशासक, हळवा माणूस!
प्रशासनात ‘कठोर दादा’ म्हणून ओळखले जाणारे अजित पवार वैयक्तिक जीवनात अत्यंत शिस्तप्रिय मात्र कार्यकर्त्यांप्रति हळवे होते. कोणताही गाजावाजा न करता कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात धावून जाण्याचा त्यांचा वेगळा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने केवळ एक नेताच नव्हेतर, हजारों कार्यकर्त्यांचा ‘आधारवड’ कोसळला आहे.

‘जे आहे, ते तोंडावर’!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणाची सर्वात ठळक ओळख म्हणजे दादांचा स्पष्टवक्ता स्वभाव. ‘शब्दाचा पक्का’, एकदा शब्द दिला की तो पाळायचाच, मग त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागो असा त्यांचा बेधडक स्वभाव होता. संपूर्ण महाराष्ट्र झोपलेला असताना पहाटे पाच वाजता दादांचा दरबार गजबजलेला असायचा. सकाळी सात वाजता दादा मंत्रालयात हजर असायचे. शिस्त आणि वेळेचे पालन याचा आदर्श म्हणजे दादा होते.

धाडसी निर्णयांचा ‘टाईमलाईन’!
1991 सालच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून विजय मिळवणार्‍या अजित पवार यांनी संसदेपासून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. काका शरद पवार यांचा हात धरुन राजकारणाचे धडे गिरवणार्‍या अजित पवार यांनी 2019 मध्ये राजभवनात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन संपूर्ण देशाच्या राजकारणाला हादरा दिला होता. 2023 मध्ये काकांची साथ सोडून त्यांनी महायुती सरकारमध्ये सहभागी होवून राजकारणाची आपली स्वतंत्र दिशा निश्‍चित केली. अर्थमंत्री म्हणून विक्रमीवेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

‘मनोमिलनापूर्वीच’ काळाचा घाला!
काकांचा विचार डावलून 2023 मध्ये भाजपशी संधी साधणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महापालिका निवडणुकीपासून मूळपक्षाशी जवळीक वाढली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही काका-पुतण्याने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. आज सकाळीही ते निवडणुकीच्या प्रचारासाठीच बारामतीच्या दौर्‍यावर निघाले होते. दिवसभरात तीन ठिकाणी त्यांच्या सभा होणार होत्या. या निवडणुकीच्या यशापयशातून दोन्ही राष्ट्रवादीचे राजकीय भवितव्य ठरणार होते, मात्र त्याचा निकाल समोर येण्यापूर्वीच विमान अपघातात दादा गेले आणि काकांसोबत पुन्हा मनोमिलनाचे त्यांचे स्वप्नंही अर्धवटच राहीले.

Visits: 51 Today: 3 Total: 1411863

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *