कोरोना मृतांच्या वारसांना केंद्राने तातडीने चार लाखांची मदत द्यावी! महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंबातील प्रमुख, अनेकांचे जवळचे नातेवाईक यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. मात्र बरेच दिवस झाल्यावरही केंद्र सरकारने अद्यापही पैसे दिले नसून केंद्र सरकारने तातडीने तीन लाख रुपये द्यावे व एक लाख रुपये राज्य सरकारने द्यावी अशी आग्रही मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे गटनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या पत्राद्वारे नामदार थोरात यांनी मागणी करताना म्हटले आहे की, राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना शिक्षण, आरोग्य आणि इतर आवश्यक सेवांसाठी मूलभूत अधिकार दिलेला आहे. कोरोना महामारीमध्ये अनेक कुटुंबातील प्रमुख व्यक्ती, अनेकांचे जवळचे नातेवाईक, मित्र यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. या सर्व मृत व्यक्तींच्या वारसांना केंद्र सरकारने भरीव मदत करावी अशी आग्रही मागणी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केली होती. यावरून केंद्र सरकारने मृत व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. यातील 75 टक्के रक्कम म्हणजे तीन लाख रुपये केंद्र सरकार, तर 25 टक्के रक्कम म्हणजे एक लाख रुपये राज्य सरकार देईल असे निर्देश दिले होते. मात्र कोरोना काळात अनेक दिवस उलटून गेल्यानंतर हे अद्यापही ही मदत मिळाली नाही. सानुग्रह अनुदानतून 50 हजार रुपये आपत्ती निधीतून देण्यात येणारी मदत अतिशय तुटपुंजी आहे. कोविड आपत्ती जाहीर करून केंद्र सरकारने अनेक कडक निर्बंध लावले यातून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून भरभक्कम दंड वसूल करण्यात आले, अशावेळी मृत व्यक्तींच्या वारसांना तातडीने मदत देणे गरजेचे आहे.

केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थांवरील करातून लाखो करोडो रुपयांची कमाई करते आहे आणि बड्या उद्योगपतींना कॉर्पोरेट टॅक्समध्ये भरघोस सवलत देते आहे. मात्र कोरोना पीडितांना मदत द्यावयाला निधीची अडचण येते हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून या कोरोना वारसांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत मिळावी याकरिता राज्य सरकारचा असलेली एक लाख रुपये रक्कम अदा करण्याची हमी राज्य सरकारने द्यावी म्हणजे यातून केंद्र सरकारवर दबाव येऊन ते बाधित नागरिकांना व त्यांच्या वारसांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यास प्रवृत्त होतील असेही नामदार थोरात यांनी म्हटले आहे.

Visits: 4 Today: 2 Total: 27363

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *