साईबाबा संस्थानला पुन्हा झटका; प्रशासकीय अधिकार्‍यासह सहा जणांना अटक मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया चॅनेलला पुरवून संस्थानची बदनामी केल्याचा आरोप

नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोरोनामुळे शिर्डीचे साई मंदिर बंद असले तरी इतर घडामोडींमुळे मात्र शिर्डी कायम चर्चेत आहे. नियम डावलून नियुक्ती केल्याचा आरोप झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची बदली करावी लागली. मोठ्या प्रतीक्षेनंतर नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती झाली तर न्यायालयाने त्यांचेही अधिकार गोठविले. आता त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. हे कमी म्हणून की काय एका जुन्या प्रलंबित तक्रारीच्या चौकशीत आता संस्थानच्या प्रशाकीय अधिकार्‍यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया चॅनेलला पुरवून संस्थानची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

साईबाबा मंदिराचे संरक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्यात साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागाचे प्रमुख विनोद कोते, कर्मचारी चेतक सावळे, सचिन गव्हाणे, सोसायटी कर्मचारी अजित जगताप व राहुल फुंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश तथा साई संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या मंदिर भेटीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या संस्थानचा कारभार पाहणार्‍या तदर्थ समितीचे अध्यक्ष मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि सदस्य सहायक धर्मादाय आयुक्त यांनी 31 जुलै, 2021 रोजी मंदिर परिसराला भेट दिली होती. बैठक संपल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात उपाययोजनांची पाहणी केली. मात्र, त्यांच्या या पाहणीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. कोरोनाच्या नियमांचा भंग करून या पदाधिकार्‍यांनी मंदिरात भेट दिली, दर्शन घेतले असे सांगत हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. सोशल मीडियातून तशा संबंधीच्या बातम्या प्रसारित झाल्या.

या प्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला. मात्र बराच काळ चालढकल सुरू होती. शेवटी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी लक्ष घालून यासंबंधी न्यायालयात पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. त्यामध्ये प्रशाकीय अधिकर्‍यांसह सहाजण दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या अधिकार्‍यांनी पदाधिकार्‍यांच्या पाहणीचे संस्थानच्या ताब्यातील फुटेज बाहेर खासगी व्यक्तींना पाठवून त्यासोबत चुकीचा आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केला, असा आरोप आहे.

कान्हूराज बगाटेंना अटक करा…
सदर सीसीटीव्ही फुटेज बाहेरच्यांना देण्यास तत्कालिन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे कान्हूराज बगाटे यांना अटक व्हावी. आणि या प्रकारामुळे मंदिराची सुरक्षा धोक्यात आली असून, त्याचे ऑडिट होणे गरजेचे आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 116053

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *