भंडारदरा धरणाचा पाणीसाठा साडेनऊ टीएमसीवर! पावसाचा जोर ओसरला; आढळा धरणातही समाधानकारक पाणी


नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या आठवडाभर धरणांच्या पाणलोटात धोऽधो कोसळणार्‍या पावसाचा जोर रविवारी ओसरला. त्यामुळे अकोले तालुयातील सर्वच धरणांमध्ये होणारी पाण्याची आवकही खालावली आहे. मात्र आठवडाभराच्या पावसाने नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीनही मोठ्या धरणांसह आढळा व भोजापूर धरणातील पाणीसाठा समाधानकारक अवस्थेत पोहोचवला आहे. पावसाचा जोर ओसरल्याने भंडारदर्‍यातून सोडला जाणारा विसर्गही बंद करण्यात आला असून सध्या केवळ विद्युत निर्मितीसाठी ८३५ युसेकने पाणी सोडले जात आहे. आठवडाभराच्या पावसाने मुळा धरण ६६, भंडारदरा ८६, निळवंडे ७६ तर दुष्काळी भागाला संजीवनी देणार्‍या आढळा धरणाचा पाणीसाठा ७० टयांवर पोहोचला आहे.

जूनच्या मध्यापासूनच अकोले तालुयाच्या पश्चिम घाटमाथ्यावर आवेशाने कोसळणार्‍या पावसाला यंदा म्हणावा तसा जोरच चढला नाही. मागील वर्षी लांबलेल्या पावसासह त्यानंतर वर्षभर अधुनमधून झालेल्या अवकाळी पावसाने पाण्याची मागणी घटल्याने जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांसह आढळा धरणात जवळपास निम्मा पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे यावर्षी जुलैच्या मध्यापर्यंतच जिल्ह्यातील सर्व प्रकल्प ओसंडून वाहतील असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र तसे घडलेच नाही. जुनचा संपूर्ण महिना जेमतेम पाऊस वगळता पावसाला जोरच चढला नाही. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रातही चिंता निर्माण झालेली असतांना निम्मा जुलै सरल्यानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाने लय पकडली, मात्र तरीही त्याला म्हणावा तसा जोर नसल्याने मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीनही धरणांमध्ये संथगतीने पाणी दाखल होत होते.

गेल्या आठवड्यात मात्र पाणलोटात चालू हंगामात पहिल्यांदाच वरुणराजाने रुद्वावतार धारण केला आणि धरणांचे चित्रच पालटले. अवघ्या आठ दिवसांतच तीनही मोठ्या धरणांसह दुष्काळी भागांसाठी संजीवनी ठरलेल्या आढळा व भोजापूर या जलाशयांच्या पाणलोटातही पावसाने हजेरी लावली आणि तहाणलेल्या या जलाशयांमध्येही पाण्याची आवक सुरु झाली. उशिराने सुरु होवूनही पावसाने उत्तर नगर जिल्ह्यातील बहुतेक सर्वच धरणांची स्थिती उंचावल्याने लाभक्षेत्रात आनंद निर्माण झाला आहे. मात्र रविवारपासून पाणलोटातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरला असून धरणांच्या दिशेने धावणारे ओढेनालेही आता मरगळले आहेत. त्यामुळे भंडारदर्‍यातून सुरु असलेला मोठा विसर्ग आता पूर्णतः थांबवण्यात आला असून सध्या केवळ धरणाच्या विद्युतगृह क्रमांक एकच्या बोगद्याद्वारे अवघा ८३५ युसेकचा विसर्ग सुरु आहे.

सकाळी ६ वाजता संपलेल्या २४ तासांत रतनवाडी येथे सर्वाधिक ६३ मि.मी, घाटघर ५२ मिमी, पांजरे ४२ मि.मी, भंडारदरा ३२ मि.मी, वाकी १२ मि.मी, निळवंडे ०९ मि.मी व कोतुळ येथे ०८ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. चोवीस तासांत मुळा धरणात ५३७ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होवून पाणीसाठा १७ हजार १८६ दशलक्ष घनफूट (६६.१० टक्के), भंडारदर्‍यात ३५३ दशलक्ष घनफूटाची आवक होवून पाणीसाठा ९ हजार ५३० (८६.३३ टक्के), निळवंडे धरणात २२३ दशलक्ष घनफूटाची आवक होवून पाणीसाठा ६ हजार ३४१ दशलक्ष घनफूट (७६.१४ टक्के), आढळा धरणात ३७ दशलक्ष घनफूट पाणी दाखल होवून पाणीसाठा ७४२ दशलक्ष घनफूट (७० टक्के) तर भोजापूर जलाशयात सहा दशलक्ष घनफूट पाणी दाखल होवून पाणीसाठा १५५ दशलक्ष घनफूटावर (४२.९४ टक्के) पोहोचला आहे. सकाळी कोतुळनजीकच्या मुळा नदीपात्रातून ३ हजार ८२२ युसेकने पाणी वाहत होते.


यंदाच्या वर्षी पावसाचा लहरी स्वभाव अधिक प्रकर्षाने दिसून आला असून पावसाळा सुरु होवून दोन महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही अद्याप पाणलोटाला साजेशा पाऊस कोसळलेला नाही. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने मुळा, भंडारदरा व निळवंडे या तिनही धरणांमधील पाणीसाठे नियंत्रित टप्प्यात आणण्याची योजना आखली जात असून त्यानुसार भंडारदरा धरणाची पाणीपातळी वाढविण्यासाठी रविवारी सकाळपर्यंत सुरु असलेला विसर्ग थांबवण्यात आला आहे. मागील चार-पाच दिवसांत भंडारदर्‍यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्यानंतरही निळवंडे धरणाचे दरवाजे बंदच ठेवले गेल्याने प्रवरेवरील या दोन्ही धरणांतील पाणीसाठा समाधानकारक स्थितीत पोहोचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *