फरार पिकअप चालकाच्या राजूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या चिंचोडीजवळ दुचाकीला दिलेल्या धडकेत एक ठार, दोघे गंभीर जखमी
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील चिंचोडी गावाजवळील अपघातात दुचाकीवरील तीन युवकांना धडक देऊन वाहनासह फरार झालेल्या पिकअप चालकाच्या राजूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत मुसक्या आवळत गजाआड केले. याबद्दल पोलिसांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चिचोंडी जवळील वाकी रस्त्यावर झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघे गंभीर जखमी झाले होते. धडक देऊन पिकअप चालकाने धूम ठोकली होती. यामुळे राजूर पोलिसांपुढे वाहन व वाहनचालकाचा शोध लावणे आव्हान होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.प्रवीण थोरात व त्यांच्या सहकार्यांनी त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत परिसरातील पिकअप वाहन तपासणी सुरुच ठेवली होती. त्यात अपयश आले तरी थोरात यांनी तपास सुरुच ठेवला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास लागतो का याचा प्रयत्न सुरु केला. त्यावेळी वन विभागाच्या टोलनाक्यावरुन घाटघरच्या दिशेने 5:27 मिनिटांनी एक पिकअप (एमएच.17, एजी.6842) वाहन गेल्याचे दिसून आले.
पंरतु हे वाहन त्याच टोलनाक्यावरुन परत फिरताना सीसीटीव्ही कॅमेर्यात बिगर ताडपत्रीचे दिसून आल्याने पोहेकॉ.थोरात यांचा ‘त्या’ पिकवर संशय बळावला. त्यांनी पिकअपच्या क्रमांकावरुन तत्काळ मालकाचा शोध घेत त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. तेव्हा पिकअप चालकाने आपणच त्या तिघांना उडविल्याचे सांगितले. पोलिसांनी पिकअप चालक दातीर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खैरनार, दिलीप डगळे, प्रवीण थोरात आदी करत आहे. दरम्यान, अवघ्या 24 तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.