देशभरात जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणार ः हळकुंडे
देशभरात जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणार ः हळकुंडे
बंद असलेल्या कंपन्याही कार्यान्वित करण्यासाठी मदत करणार असल्याचा निर्धार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हाच निर्धार व्यक्त केला असून, ‘एआयएफसी’ अॅग्रो इंडिया फेडरेशनच्या माध्यमातून देशात व राज्यात जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचा मनोदय फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक संदीप हळकुंडे यांनी व्यक्त करुन स्थापन झालेल्या अनेक कंपन्या योग्य मार्गदर्शनाअभावी बंद आहेत. त्या कार्यान्वित करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचा विश्वासही दिला आहे.
याविषयी अधिक बोलताना हळकुंडे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने शेतकर्यांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्याचे काम चालू केले आहे. त्याची माहिती देणे, प्रस्ताव तयार करणे व मंजुर करण्याची कामे फेडरेशनच्या माध्यमातून करणार आहोत. केंद्र शासनाच्या ‘आत्मनिर्भर शेती, आत्मनिर्भर शेतकरी’ मार्फत 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी शेतकर्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर पशु संवर्धन 15 हजार कोटी, मत्स्यसंपदा 20 हजार कोटी आणि वनौषधी 5 हजार कोटी रुपये अशाही तरतुदी केल्या आहेत.
तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून ‘स्मार्ट’ योजनेचे बजेट 2100 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर ‘मॅगनेट’ योजनेचे सुद्धा 1000 कोटी रुपयांचे बजेट आहे. या सर्व योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचवणे, प्रस्ताव तयार करणे व मंजुर करण्याचे काम‘एआयएफसी’ फेडरेशनच्या माध्यमातून करणार आहोत. शेतकर्यांनी पिकविलेल्या मालाच्या विक्रीसाठी शेतकरी ते ग्राहक अशी थेट मुख्य साखळी उभी करायची आहे. त्याचबरोबर शेतकर्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. अनेक शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग व शेतमाल, एक्सपोर्ट करणारे व्यापारी आमच्याशी जोडले गेले असल्याचे सांगून, त्यांच्याशी शेतकर्यांशी जोड करून देणे, गट शेतीसाठी प्रोत्साहन देऊन बहुपिक पद्धती एकत्रित खते व औषधे खरेदी करणे, शेतातील नवीन तंत्रज्ञान व यांत्रिकी क्रिया शेतकर्यांच्या बांधावर पोहचून उत्पादन खर्च कमी करून थेट विक्री व्यवस्था निर्माण करणे व शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अध्यक्ष सतीष कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे हळकुंडे यांनी सांगितले आहे.
‘एआयएफसी’ अॅग्रो इंडिया फेडरेशन देशभरातील शेतकर्यांसाठी हक्काचे व्यासपीठ बनले आहे. आगामी काळातही केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी मार्गदर्शन करुन उत्पन्न वाढीसाठी शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहोत. शेतकर्यांनीही उत्पादक कंपन्या निर्माणासाठी पुढे येऊन आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी.
– सतीष कानवडे (अध्यक्ष, एआयएफसी)