संगमनेर तालुका तिसर्या संक्रमणाच्या उंबरठ्यावर! जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढ असलेला तालुका; नियमांची अंमलबजावणी मात्र शून्य
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील कोविड संक्रमणात घट नोंदविली जात असताना संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या मात्र अद्यापही आटोक्यात येत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यातही मागील महिन्याच्या तुलनेत तालुक्याच्या सरासरी रुग्णगतीत आणखी वाढ झाल्याने अहमदनगर जिल्हा तिसरा लाटेचा जन्मदाता ठरतो की काय अशीही भीती निर्माण झाली आहे. मंगळवारी संगमनेर तालुक्याच्या दौर्यावर आलेल्या विभागीय आयुक्तांनीही तशीच चिंता व्यक्त केली आहे. एकीकडे जिल्ह्यातील सर्वाधीक रुग्णसंख्या वाढत असतांनाही स्थानिक पातळीवर मात्र नियमांची अंमलबजावणी करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याने तालुका आता तिसर्या संक्रमणाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्रही ठळकपणे दिसू लागले आहे. सध्या जिल्ह्यातून सरासरी 757 रुग्ण तर एकट्या संगमनेर तालुक्यातून 157 रुग्ण समोर येत आहेत. मागील 21 दिवसांत तालुक्यातून उच्चांकी 3 हजार 285 रुग्ण समोर आले आहेत.
गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील संक्रमणात मोठी घट नोंदविली गेली असून चालू महिन्यातील पहिल्या 21 दिवसांत त्यात सातत्य असल्याचेही आएळून आले आहे. मात्र संगमनेर तालुका त्याला अपवाद ठरला असून मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात आत्तापर्यंत समोर आलेल्या रुग्ण संख्येवरुन तालुक्यातील एकूण सरासरी रुग्णगतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहेत. गेल्या महिन्यात (ऑगस्ट) संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 783 रुग्ण दररोज या गतीने 24 हजार 247 रुग्णांची तर संगमनेर तालुक्यात सरासरी 137 रुग्ण या गतीने एकूण 4 हजार 249 रुग्णांची भर पडली होती. चालू महिन्यात जिल्ह्याच्या एकूण रुग्णगतीत घट होवून आत्तापर्यंत सरासरी 757 रुग्ण दररोज या गतीने 15 हजार 903 रुग्णांची तर संगमनेर तालुक्यातील रुग्णगतीत आणखी वाढ होवून दररोज 156 रुग्ण या गतीने आत्तापर्यंत 3 हजार 285 रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक गतीने रुग्ण समोर येणार्या तालुक्यांमध्ये संगमनेरचे नाव आजही अव्वलस्थानी कायम आहे. मागील 20 दिवसांमध्ये रुग्ण समोर येण्याच्या प्रक्रीयेत संगमनेर (3285), पारनेर (1797), अकोले (1394), पाथर्डी (1340), श्रीगोंदा (1338), राहाता (964), शेवगाव (875), नेवासा (802), नगर ग्रामीण (771), कर्जत (743), राहुरी (721), अहमदनगर महापालिका क्षेत्र (583), कोपरगाव (487), श्रीरामपूर (428) व जामखेड (395) अशा पद्धतीने रुग्ण समोर आले आहेत. वरील तालुक्यांमधून रुग्ण समोर येण्याची आकडेवारी लक्षात घेता संगमनेर तालुक्यातील रुग्णवाढ चिंताजनक असल्याचे अगदी स्पष्टपणे समोर येत आहे.
नव्याने संक्रमित होणारे आणि कोणतीही लक्षणे अथवा त्रास नसलेले रुग्ण मर्यादा ओलांडून गर्दीत वावरत असल्याने त्याचा फटका तालुक्यातील रुग्णगती वाढण्यात होत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. राज्यातील व्यवहारांना खुले करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही कोविड नियमांचे पालन करण्याची सक्ती मात्र कायम आहे. परंतु या नियमांचा आता नागरिकांसह प्रशासनालाही विसर पडल्यासारखी अवस्था असल्याने स्रावचाचणी सकारात्मक आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तिंची शोध मोहीम ठप्प झाली आहे. त्यामुळे संक्रमित असलेल्या व्यक्तिंचा अर्निंबंध सार्वजनिक वावर रोजची रुग्णवाढ होण्यास कारणीभूत ठरत आहे. यासोबतच अनेकजण लक्षणे असूनही चाचणी करण्याचे टाळत असल्याचेही समोर आले असून परस्पर खासगी डॉक्टरांकडून उपचार घेत असल्याचाही फटका तालुक्याची कोविड स्थिती बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौर्यावर असलेल्या विभागीय आयुक्त डॉ.राधाकृष्ण गमे यांनीही कोविडचे संक्रमण टिकून राहण्यात आणि त्यात सातत्याने वाढ होण्यास नियमांकडे दुर्लक्ष हेच कारण असल्याचे सांगितले असून वेळीच नागरिक आणि प्रशासन सतर्क न झाल्यास राज्यात तिसर्या लाटेचा उगम अहमदनगर जिल्ह्यातूनच होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच जिल्ह्यातील अधिक प्रादुर्भाव असलेल्या तालुक्यांमध्येही त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या असून तेथील आरोग्य व्यवस्थांची पाहणीही त्यांनी केली. आरटीपीआर चाचण्यांचा वेग वाढवण्यासह रुग्णांचा संपर्कशोध आणि प्रतिबंधीत क्षेत्रांबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहे. मात्र त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही यावरुनच तिसर्या लाटेचे गणित अवलंबून असल्याचे चिंताजनक दृष्यही आता जिल्ह्यातून समोर येवू लागले आहे.