डांगी बैलांचे आगार असलेल्या खिरविरेत बैलपोळा उत्साहात साजरा जीवापाड जपलेल्या सर्जा-राजांची वाजत-गाजत काढली मिरवणूक

नायक वृत्तसेवा, अकोले
बळीराजाच्या सदैव साथीला असलेल्या लाडक्या बैलांचा सण हा श्रावण महिन्यातील बैलपोळा या दिवशी सर्वत्र मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो. यंदाही अकोले तालुक्यातील आदिवासी भागासह संपूर्ण तालुक्यात पारंपारिक पद्धतीने बळीराजाच्या लाडक्या सर्जा-राजाचा बैलपोळा सण आनंदात साजरा झाला.

पारंपारिक प्रजाती डांगी बैलांचे आगार मानले जाणारे खिरविरे गावातील बैलपोळा हा सण अत्यंत दिमाखात आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा केला जातो. यावर्षी देखील तितक्याच आनंदाने हा साजरा झाला. आपल्या लाडक्या बैलांना शेतकरी राजा आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जीव लावत असतो. वर्षातून एकदा येणार्‍या या सणाचे औचित्य साधून आपल्या बैलजोडीची पूजा करून त्यांची मिरवणूक काढली गेली. ग्रामदैवताच्या साक्षीने नैवेद्य देऊन ऋण व्यक्त केले. सर्वत्र बैलपोळा सणाचा उत्सव खेडोपाडी मोठ्या प्रमाणात पहायला भेटला. आदिवासी भागातील गरीब शेतकर्‍यांनी आपल्या सर्जा-राजाला सजवण्यासाठी जीवापाड कष्ट घेतले. सकाळपासूनच सणाची लगबग सुरू होती. जीवापाड जपलेल्या आपल्या बैलजोडीला स्वच्छ अंघोळ घातली.

या कामात बालगोपाळांना अधिक रस असल्याने त्यांनी हे काम अतिशय मन लावून केले. पारंपारिक सजावटीचे साहित्य वापरून बैलांना सुंदर पद्धतीने सजवले. यामध्ये पाठीवर टाकायची रंगीत पानाफुलांनी सजवलेली झूल, गळ्यातील माळा व घंटी, शिंगांना बेगडं आणि चमचमत्या पट्ट्या, फुगे बांधून जोडीला सजवले होते. आदिवासी भागामध्ये डांग प्रजातीच्या बैलांचे शेतीकामासाठी महत्त्वाचे स्थान आहे. डांगी प्रजातीच्या बैलांमध्ये नैसर्गिकपणे डोंगर उतारावर चढणे-उतरण्याची क्षमता असते. डांगी प्रजातीच्या बैलांची त्वचा तेजदार व तेलकट असते. त्यामुळे पावसाचे पाणी निथळून जाण्यास मदत होते. डांगी प्रजातीच्या बैलांचे पायांचे खूर अतिशय काटक आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. ज्यामुळे ते भात शेतीसारख्या कामांना सर्वोत्तम मानले जातात. आदिवासी शेतकरी डांगी बैल जोडीला आपला ट्रॅक्टर संबोधतात. शेतकर्‍यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा सण असल्याने त्याचे अनन्यसाधारण महत्त्व ग्रामीण भागात पहायला मिळाले. आजही आदिवासी भागांमध्ये ट्रॅक्टरसारखे अवजारे संख्येने अत्यल्प असल्याने बैलांशिवाय शेती होत नाही हेच यावरुन दिसून येते.

Visits: 204 Today: 1 Total: 1881323

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *