भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार? आगामी निवडणुकांपूर्वी राहुरी मतदारसंघात चर्चांना उधाण

नायक वृत्तसेवा, राहुरी
राज्यात सध्या भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यात मात्र वेगळ्या राजकीय घडमोडींची चर्चा सुरू आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. स्वत: कर्डिले यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मात्र कर्डिले यांच्या जवळच्या कार्यकर्त्याने नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आणि अलिकडेच कर्डिले भाजपच्या उपक्रमांमध्ये फारसे सक्रीय नसल्याने या चर्चेला उधाण आलं आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे अरुण जगताप नुकतेच निवृत्त झाले आहेत. मात्र, मुदत संपल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे मतदारसंख्या कमी असल्याने या जागेवरील निवडणूक लांबणीवर पडली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या पाठोपाठ विधान परिषदेचीही निवडणूक होईल. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून कर्डिले या जागेचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी यासाठीची तयारीही सुरू केली आहे. कर्डिले हे जगताप यांचे व्याही आहेत. या मतदारसंघात जगताप आणि राष्ट्रवादी यांचे प्राबल्य लक्षात घेऊन कर्डिले हे राष्ट्रवादीत प्रवेश करून ही निवडणूक लढवणार असल्याचा विचार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे आणि पदाधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा प्रवेश मुंबईत थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. त्यामुळे आता कर्डिले यांच्याही राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. भनगडे हे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत. जिल्हा परिषदेत यापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता असल्याने व राजकीय गणित करून त्यांनी राष्ट्रावादीत प्रवेश केला. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या पक्षांतराची चर्चा राष्ट्रवादीच्या काही मंडळींकडूनच मुद्दाम घडवून आणण्यात येत आहे. लोक आणि कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा हेतू यामागे आहे. आपण भाजपमध्येच असून भविष्यातही भाजपमध्येच राहणार आहोत. कार्यकर्त्यांनी अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही कर्डिले यांनी केलं आहे.

Visits: 89 Today: 2 Total: 1111165

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *