हिंदूंच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार ः चव्हाणके संगमनेरात 1827 वा गुन्हा; पंधरा दिवसांत 16 कोटी लोकांनी संगमनेर ‘सर्च’ केले
नायक वृत्तसेवा, संगमनेर
हिंदू समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी संगमनेरच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शांततामय मार्गाने काढलेल्या मोर्चामुळे अनेकांचे पोटसूळ उठले असून त्यांच्यावर आकसापोटी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व षडयंत्रामागे कोणाचा हात आहे हे लपून राहिलेले नाही. माझ्यावर यापूर्वी 1 हजार 826 गुन्हे दाखल झाले आहेत, हिंदूंच्या न्यायासाठी अशाप्रकारचे अठरा हजार गुन्हे दाखल झाले तरीही त्याची पर्वा नाही. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्रीही अशा खोट्या गुन्ह्यातून वाचले नाहीत, हाच आमचा आदर्श असून शेवटपर्यंत संघर्ष करीत राहणार असल्याचा एल्गार हिंदुत्ववादी नेते सुरेश चव्हाणके यांनी संगमनेरात येवून पुकारला.
गेल्या सहा जून रोजी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी संगमनेरात सकल हिंदू समाज या बॅनरखाली भगवा मोर्चा आयोजित केला होता. अतिशय शांततामय वातावरणात पार पडलेल्या या मोर्चाला समनापूरात झालेल्या दगडफेकीने गालबोट लागले. दरम्यान, हल्ल्याच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात संगमनेरमध्ये झालेले सुरेश चव्हाणके यांचे प्रक्षोभक भाषण कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून संगमनेर शहर पोलिसांनी त्यांच्यासह स्थानिक बजरंग दलाचे विशाल वाकचौरे व योगेश सूर्यवंशी अशा तिघांवर गुन्हा दाखल केला. त्या पार्श्वभूमीवर चव्हाणके यांनी संगमनेरात येवून कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना चव्हाणके म्हणाले की, संगमनेरात निघालेला हिंदू समाजाचा अभूतपूर्व मोर्चा पाहून अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत, त्यातूनच स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे पद्धतशीर षडयंत्र राबविले जात आहे. यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातही अशाच खोट्या तक्रारी दाखल करून त्यांच्या मानसिकतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, यामागे तिस्ता जावेद सेटलवाड यांचा हात असल्याचे लपून राहिलेले नाही. अशाप्रकारच्या कारस्थानांना आम्ही कधीही भीक घालीत नाही, यापूर्वी आपल्यावर 1 हजार 826 गुन्हे दाखल झाले असून संगमनेरातील हा 1 हजार 827 वा गुन्हा आहे. अशा प्रकारचे अठरा हजार गुन्हे दाखल झाले तरीही हिंदूंच्या न्यायासाठी सुरू असलेला संघर्ष थांबणार नाही असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
संगमनेरात निघालेला सकल हिंदू समाजाचा विराट भगवा मोर्चा जगाच्या नकाशावर आला असून गेल्या पंधरा दिवसांत जगभरातील 16 कोटी लोकांनी गुगलवर संगमनेरचे नाव सर्च केले आहे. यावरून चांगल्या चांगल्यांना आग लागली असून त्याचे परिणाम दाखल गुन्ह्याच्या रूपाने दिसत आहे असा घणाघातही सुरेश चव्हाणके यांनी यावेळी केला.