पठारावरील नुकसानग्रस्त पिकांचे त्वरीत पंचनामे करा ः ढोले
पठारावरील नुकसानग्रस्त पिकांचे त्वरीत पंचनामे करा ः ढोले
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व ढगफुटीसदृश्य पावसाने संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, महसूल व कृषी विभागाने त्वरीत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी युवा नेते बाळासाहेब ढोले यांनी केली आहे.
यावर्षी सर्वत्र झालेल्या मुसळधार व ढगफुटीसदृश्य पावसाने हातातोंडाशी आलेला घासही हिरावून नेला आहे. पठारावर अक्षरशः शेतामध्ये पाणी साचून संपूर्ण पिके सडून गेली आहेत. त्याचबरोबर ढगफुटीसदृश्य पावसाने शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकामागून एक आलेल्या सुलतानी संकटांमुळे शेतकर्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता शेतकरी हा सगळीकडूनच आर्थिक संकटात सापडला आहे असे असताना देखील अद्यापही महसूल व कृषी विभागाने पंचनामे केले नाही. त्यातच 65 मिलीमीटरच्या पुढे पाऊस पडला असेल तरच पंचनामे करण्याचे आदेश आम्हांला दिले आहे असे महसूलचे अधिकारी सांगत आहे. पण सतत पडणार्या पावसामुळे काहीच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे आता तरी शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी युवा नेते बाळासाहेब ढोले यांनी केली आहे.