कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात रानडुक्कराची शिकार करणार्‍यास अटक चौघे फरार होण्यात यशस्वी; आंतरजिल्हा रॅकेट असल्याचे तपासातून उघड

नायक वृत्तसेवा, अकोले
एकीकडे कोरोनाचे भयावह संकट असताना वन्य श्वापदांची शिकार होत असल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यात उघडकीस आला आहे. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य राजूर वनक्षेत्रात रानडुक्कराची शिकार करत असताना एका आरोपीस अटक केली असून, चारजण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, वनपाल कोथळे यांना मिळालेल्या गुप्त खबरीवरुन सोमलवाडी शिवारामध्ये रानडुक्करांची बंदुकीने शिकार झाल्याची खबर मिळाली. त्यांनी तत्काळ वन कर्मचार्‍यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची शहानिशा करून वरिष्ठांना सर्व परिस्थितीची कल्पना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गणेश रणदिवे (सहा. वनसंरक्षक कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य), दत्तात्रय पडवळे (वनक्षेत्रपाल वन्यजीव राजूर) यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीची चक्रे वेगाने फिरवून गंभीरवाडी (सोमलवाडी) येथील एका संशयित आरोपीच्या घरातून अ‍ॅल्युमिनियमच्या पातेल्यात ठेवलेले जंगली प्राण्याचे मांस जप्त करून त्यास तत्काळ चौकशीसाठी ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणी रायगड व ठाणे जिल्हा येथील 4 आरोपींची संपूर्ण माहिती तपास अधिकार्‍यांच्या हाती लागली आहे. हे आंतरजिल्हा रॅकेट असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये गुन्हा नोंद करून इतर गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.


राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ धोरणांतर्गत कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. तरी देखील संचारबंदीचे सर्रासपणे उल्लंघन करुन शिकारी बिनधास्तपणे वन्य श्वापदांची शिकार करत असल्याने वन्यजीव प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, कडक कारवाईची मागणी होत आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 117859

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *