लस घेणारा एकही नागरिक बाधित आढळला नाही! रविवारपासून दोनशे जणांची ‘रॅपिड’ चाचणी; सर्व निष्कर्ष ‘निगेटिव्ह’..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लस उपलब्ध होण्यात येणार्या अडचणी आणि त्यातच वाढत्या प्रादुर्भावात लस मिळविण्यासाठी उसळणार गर्दी कमी व्हावी यासाठी संगमनेरात लस घेण्यापूर्वी प्रत्येकाची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारपासून या निर्णरूाची अंमलबजावणीही सुरु झाली असून आत्तापर्यंत दोनशे जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील एकालाही कोविडचा संसर्ग झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र चाचणीच्या निर्णयामुळे लसीकरण केंद्रावर होणारी अनावश्यक गर्दी आटोक्यात आणण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे.
सध्या राज्यासह जिल्ह्यातील कोविडचा प्रादुर्भाव प्रचंड भरात आहे. त्यातच केंद्र सरकारने आधी जाहीर केलेल्या 45 वर्षांपुढील व्यक्तिंचेच लशीकरण पूर्ण झालेले नसतांना 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी लस खुली केली गेल्याने देशभर गोंधळ निर्माण झाला आहे. उत्पादनाच्या प्रमाणात लशीच उपलब्ध नसल्याने ठिकठिकाणच्या लशीकरण केंद्रांमध्ये भल्या पहाटेपासूनच रांगा लागत आहेत. मात्र तरीही लस मिळत नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा उद्रेकही बघायला मिळत असून अनावश्यक गर्दी होत असल्याने अनेक ठिकाणच्या संक्रमणातही वाढ झाली आहे.
त्या पार्श्वभूमीवर संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी लस देण्यापूर्वी प्रत्येक लाभार्थ्याची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. रविवारपासून (ता.9) या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरु झाली आहे. रविवारी दिवसभरात घुलेवाडीच्या लसीकरण केंद्रात 128 जणांच्या रॅपिड चाचण्या घेण्यात आल्या, विशेष म्हणजे रविवारच्या दिवसभरात एकाही नागरिकाचा निष्कर्ष पॉझिटिव्ह आला नाही. आज सकाळपासून वृत्त लिहेपर्यंत घुलेवाडीतील 72 जणांच्या रॅपिड चाचण्या करुन त्यांना लस देण्यात आली. रविवारपासून आजपर्यंत एकूण दोनशे चाचण्या झाल्या असून त्यासर्व निगेटिव्ह आहेत.
शनिवारपर्यंत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात लशीसाठी दररोज पहाटेपासूनच मोठी गर्दी व्हायची. अनेक ज्येष्ठ नागरिक व 18 वर्षांवरील तरुण रांगा लावून आपला नंबर कधी येईल याची प्रतिक्षा करायचे. या गर्दीत काहींना सौम्य लक्षणे असायची, तर काहींना लक्षणे नसतांनाही लागण झालेली असत. त्यामुळे लशीकरणाची रांगही कोविड प्रादुर्भावाचे ठिकाण बनली होती. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वकांक्षी ठरला असून रविवारपासून घुलेवाडीच्या लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी रोडावली आहे.
सध्या उपलब्ध लशीनुसार दुसरा डोस असलेल्यांना प्राधान्य दिले जात आहे. ही सर्व प्रक्रीया पारदर्शी व्हावी यासाठी प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयाच्या लसीकरण केंद्राबाहेर चार बॉक्स ठेवले असून कोविशील्ड व कोव्हॅक्सिन, पहिला व दुसरा डोस अशी त्याची वर्गवारी केली आहे. संगमनेर परिसरातील नागरिकांनी आपले नाव, वय, पत्ता व संपर्क क्रमांक लिहून त्या बॉक्समध्ये चिठ्ठी टाकायची. उपलब्ध लशीनुसार प्रशासन त्यातील तितक्या चिठ्ठ्या बाहेर काढून तितक्या नागरिकांना लसीकरण करीत आहे. संगमनेरच्या प्रशासनाने राबविलेल्या या ‘पॅटर्न’चे सकारात्मक परिणामही समोर येत आहेत.