हिंदू मंदिराच्या प्रांगणात गोवंशाच्या रक्ताचा पाट! संगमनेरातील संतापजनक प्रकार; कठोर कारवाईची मागणी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून सतत चर्चेत असलेल्या संगमनेर शहरातून आता संतापजनक प्रकार समोर आला आहे. अतिशय धक्कादायक या प्रकारात अज्ञात कसायांकडून कायद्याची खिल्ली उडवत सुरु असलेल्या बेकायदा गोवंश कत्तलीतून वाहणारे रक्त चक्क हिंदू मंदिराच्या प्रांगणात सोडण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकाराबाबत कार्यकर्त्यांकडून वारंवार सूचना देवूनही कोणताच बदल होत नसल्याने शहरातील हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यातून शहराच्या शांततेला डंख लागण्याची दाट शक्यता असून पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून आपल्या कर्तव्याला जागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या संतापजनक घटनेची छायाचित्रे सोशल माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर शहरात प्रचंड रोष निर्माण झाला असून या प्रकारामागे संगमनेर अशांत करण्याचे षडयंत्र तर नाही याचाही तपास करण्याची मागणी होत आहे.


याबाबत विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल व दूर्गावाहीनी या हिंदुत्त्ववादी संघटनांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात छायाचित्रांसह गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे रस्त्यावर असलेल्या कमल पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूच्या कसाईवाड्याच्या परिसरात सदरचा प्रकार सुरु असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या परिसरात असलेल्या राजवाडा परिसरात दलीत समाजाची मोठी लोकवस्ती असून मातंग समाजाची कूळमाता म्हणून ओळखल्या जाणार्‍या वरखेडच्या लखाबाईचे (लक्ष्मीमाता) मंदिरही आहे. या मंदिराच्या प्रांगणातच सदरचा प्रकार सुरु असल्याचा आरोप असून त्यातून हिंदू समाजाच्या आणि देवीभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.


गेल्या काही वर्षांपासून कसाईवाड्याच्या परिसरात रात्रीच्या अंधारात गुपचूप चालणार्‍या गोवंश कत्तलीतून वाहणार्‍या रक्ताची पद्धतशीर विल्हेवाट लावली जात नाही. या परिसरातील काही कसाई जाणीवपूर्वक शहराची शांतता धोक्यात आणू पाहत असून कायद्याला आपल्या डांगेवर ठेवून चक्क हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या गोवंशाचे रक्त थेट गल्लीतून उघड्यावर सोडले जात आहे. त्याचा परिणाम गोवंशाच्या रक्ताचा हा पाट मांगवाडा म्हणून ओळखल्या जाणार्‍या मातंग समाजाच्या लोकवस्तीतून वाहत जावून जवळच असलेल्या लखाबाईच्या देवळाभोवती साचत आहे.


या प्रकाराबाबत परिसरातील रहिवाशांसह शहरातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी वेळोवेळी सूचनाही केल्या आहेत. मात्र त्याचा कोणताही परिणाम येथील कसायांवर झाला नसून आजही या परिसरात कायदा धाब्यावर बसवून राजरोस गोवंशाच्या कत्तली सुरुच आहेत. त्याशिवाय या परिसरातील काही कसायांना कायद्याचा धाकच नसल्याने त्यांच्याकडून राजरोसपणे कत्तल केलेल्या जनावरांचे रक्त चक्क रस्त्यावाटे सोडण्यात येत असून त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच लागत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून त्यातून शहराची सामाजिक शांतता अडचणीत येवू शकते. त्यामुळे पोलिसांनी वेळीच त्याचे गांभीर्य ओळखून संबंधितावर कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज आहे.


दोन महिन्यांपूर्वी अहिल्यानगर शहरातील मुकूंदनगर परिसरातही काही कसायांकडून अशाचप्रकारे गोवंश जनावरांचे कापलेले मांस लोकवस्तीच्या परिसरात फेकून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यातून अहिल्यानगर शहराचे वातावरणही तणावपूर्ण बनले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र आता तसाच प्रकार संगमनेरात सुरु झाला असून त्यामागे एखादे षडयंत्र तर नाही याचा सखोल तपास होण्यासह कायदा धाब्यावर बसवून राजरोस गोवंश कत्तलीसह शहराला अशांत करण्याच्या प्रयत्नातील या प्रवृत्तींना ओळखून त्यांच्या नांग्या ठेचण्याची आवश्यकता आहे.

Visits: 235 Today: 3 Total: 1098379

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *