दारू प्यायला पैसे न दिल्याने एकाला दगडाने ठेचले!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दारू प्यायला पैसे न दिल्याने संतापलेल्या एका १७ वर्षीय मुलाने ५३ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सुहास वाघमारे हे गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील परदेशपुरा भागात बुधवारी मध्यरात्री घडली.

शहरातील परदेशपुरा येथील देशीदारू दुकानाच्या समोर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील तंत्रज्ञ सुहास रामचंद्र वाघमारे (वय ५३) यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने या दोघात बाचाबाची झाली. या बाचाबाचीतून संतापलेल्या त्या अल्पवयीन मुलाने सुहास वाघमारे यांना खाली पाडत त्यांच्या डोक्यात टणक दगडाने मारले. आणि तो पसार झाला. या घटनेत सुहास वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडले.त्यांच्या डोक्यावर आणि कानावर गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना खाजगी दवाखान्यात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले. याप्रकरणी पो. कॉ. अजित कु-हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाडेकर गल्ली परिसरातील १७ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

परदेशपुरा येथे एक देशीदारूचे दुकान आहे. तेथे असंख्य तळीराम दारू पिण्यासाठी एकत्र येतात. याच परिसरात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र परदेशपुरा येथे तंत्रज्ञ म्हणुन सुहास वाघमारे हे काम करत होते. ते मूळचे सांगलीचे राहणारे आहेत. कामामुळे ते संगमनेरातील परदेशपुरा परिसरातच राहत होते. तेथेच जवळ देशीदारू दुकानाच्या समोर रात्रीच्या वेळी ते आले. त्यांची भेट वाडेकर गल्लीतील १७ वर्षीय तरुणासोबत झाली. या तरुणाला दारू पिण्यासाठी पैसे लागत होते. तो पूर्णतः नशेत होता. सुहास वाघमारे यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे, अल्पवयीन मुलाचा राग अनावर झाला. तो सुहास वाघमारे यांच्या सोबत वाद करू लागला आणि त्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

घटनेची माहिती समजतात शहर पोलीस ठाण्याचेनिरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ पंचनामा केला. घटनेबाबत जवळपासच्या लोकांना विचारण्यात आले. मात्र, ही घटना कोणी प्रत्यक्ष पाहिली नव्हती. जेव्हा पोलिसांनी दारूच्या दुकानाबाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा एक तरुण सुहास वाघमारे यांच्या डोक्यात टणक वस्तु मारत असल्याचे पाहायला मिळाले. मारहाण करणारा तरुण हा अल्पवयीन असुन त्याने यापूर्वी ही गुन्हे केलेले असल्याने त्याची ओळख तात्काळ झाली. तो कुठे जातो, कुठे राहतो याची माहिती काढुन त्याला दुपारी २ वाजता संगमनेर शहरातील मेनरोड परीसरातून ताब्यात घेण्यात आले.

Visits: 125 Today: 1 Total: 1416089
