कुत्र्याच्या वादातून दोघांना मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ आश्वी पोलिसांत अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये पाच जणांवर गुन्हा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याती आश्वी बुद्रुक येथे कुत्र्याच्या वादातून अनुसूचित जमाती प्रवर्गातील कुटुंबाला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता.13) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी शुक्रवारी (ता.14) आश्वी पोलिसांत विविध कलमान्वये पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आश्वी बुद्रुक येथे लखन मदने (पूर्ण नाव माहीत नाही), बंटी मदने (पूर्ण नाव माहीत नाही), अमोल जगताप (पूर्ण नाव माहीत नाही), लव्हांडे (पूर्ण नाव माहीत नाही) आणि एक अनोळखी इसम हे सोनू रोहिदास माळी याला म्हणाले की, आम्ही तुमच्या कुत्र्याच्या अंगावर गाडी घातली नाही. तुम्ही आमचे नाव का घेत आहेत? असे म्हणून शिवीगाळ करु लागले. यावर सोनू माळी व आई वंदना माळी त्यांना म्हणाले तुम्ही शिवीगाळ का करता? त्यानंतर वरील आरोपींनी थेट घरात घुसून आई व मुलाला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच मुलाचा मोबाईल जमिनीवर फेकून नुकसान केले.

यावरच न थांबता आरोपींनी जातीविषयी आक्षेपार्ह बोलून जातीवाचक शिवीगाळ करत दमबाजी केली. या प्रकरणी वंदना रोहिदास माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील पाच आरोपींविरोधात गुरनं.04/2022 भा.दं.वि. कलम 143, 147, 149, 452, 323, 504, 506, 427, अ. जा. ज. प्र. का. कलम 3(1)(आर)(एस)(टी), 3, 2, 5 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास संगमनेर भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
