साई संस्थानच्या डॉक्टरांनी खासगी कोविड सेंटरमध्ये सेवा देऊ नये! संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांचा आदेश
नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये एका महिन्यात सुमारे 90 रुग्णांचा मृत्यू झाला असून यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी संस्थानच्या कोविड रुग्णालयाची झाडाझडती घेतली असून कामात कसून करणार्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. तसेच कायम अथवा बंद पत्रावर असलेल्या डॉक्टरांनी खासगी कोविड सेंटरमध्ये सेवा देऊ नये, असा आदेश दिला आहे. तरीही अनेक डॉक्टर खासगी कोविड सेंटरवर जाऊन सेवा देत आपले खिसे भरत असल्याची चर्चा संस्थानच्या वैद्यकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
शिर्डी शहरातील साईबाबांच्या कोविड रुग्णालयात मागील महिन्यात कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थानच्या दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर संस्थानच्या सेवेत असताना रुग्णांना हवी तशी सेवा न देता फक्त तात्पुरती मलमपट्टी केल्यागत कोविड रुग्णांसाठी काम करीत असल्याने संस्थानच्या कोविड सेंटरमधील रुग्णांचे आरोग्य साईबाबांच्या श्रद्धेने ठीक झाले आहे. साईबाबा संस्थानच्या कोविड रुग्णालयात सेवा देताना टंगळमंगळ करणारे अपवाद सोडले तर अनेक डॉक्टर खासगी कोविड सेंटरमध्ये इमाने-इतबारे दर्जेदार सेवा पुरवत आहे. खासगी कोविड सेंटरला सेवा देणार्या डॉक्टरांनी संस्थानच्या कोविड रुग्णालयात सुद्धा प्रत्येक रुग्णाला दर्जेदार वैद्यकीय सेवा व उपचार द्यावेत म्हणजे साईंवर असलेली श्रद्धा व सबुरी जपली जाईल. अन्यथा पैशाच्या हव्यासापोटी जर साई संस्थान रुग्णालयात येणार्या रुग्ण साईभक्तांना योग्य सेवा दिली नाही तर त्यांच्यावर बाबांचा दंड्या फिरल्याशिवाय राहणार नाही.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणार्या मुजोर व बेजबाबदारपणे वागणार्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांवर संस्थान प्रशासनाने आता कठोर व कडक कारवाई करून त्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा साईबाबा संस्थानकडे डॉक्टर अथवा वैद्यकीय कर्मचारी म्हणून काम करत असताना बाबांच्या झोळीतून पगार घेत खासगी रुग्णालयात पैशांसाठी काम करणार्या वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचार्यांच्या तक्रारी व पुरावे साई संस्थानकडे देऊन आपण साईबाबांचे खरे भक्त सेवक असल्याचे दाखवून द्यावे. तरच साईबाबा संस्थानच्या विविध विभागातील चुकीचे काम करणार्या अशा प्रवृत्तींना मोठा धडा बसेल.
खाजगी कोविड सेंटरमध्ये सेवा देणार्या साईबाबा संस्थानच्या दोन्ही रुग्णालयातील डॉक्टरांवर नजर ठेवण्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. साई संस्थानच्या डॉक्टरांनी प्रथम प्राधान्यक्रम साईबाबा हॉस्पिटलला दिला पाहिजे. डॉक्टरांच्या इन्सेन्टिव्हबाबत संस्थान प्रशासनाची सकारात्मक भूमिका असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
– कान्हूराज बगाटे (मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान)