ज्ञानार्जनासाठी विद्यार्थी करताहेत आठ किलोमीटरची पायपीट! स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही आदिवासी भाग विकासापासून कोसो दूर
महेश पगारे, अकोले
अकोले तालुक्यातील चाळीसगाव डांगाणाची मुख्य बाजारपेठ आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या राजूरमध्ये पंचक्रोशीतील विद्यार्थी तब्बल आठ-दहा किलोमीटर अंतरावरुन रोज पायपीट करत येतात. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही विद्यार्थ्यांना साध्या दळणवळणाच्या सुविधा मिळत नसल्याचेच वास्तव आहे. त्यामुळे आदिवासी भाग अजूनही विकासापासून कोसो दूर असल्याचेच यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखीत होत आहे.
अकोले तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. त्यातही भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आहे. भंडारदरा, घाटघर, फोपसंडी अशा अतिदुर्गम भागातील गावांत अजूनही मुलभूत सुविधांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आजही अनेक गावांमध्ये शाळांच्या इमारतींची दयनीय अवस्था, आरोग्य केंद्रांची दुरावस्था, रस्त्यांवर खड्डेच खड्डे अशा अनेक सुविधांसाठी नेहमीच झगडावे लागत आहे. दळणवळणाच्याही अपुर्या सोयी असल्याने अनेकदा नागरिकांना पायपीटच करावी लागते. घाटमाथ्यांवरील उंच गावांमध्ये एसटी बसची सुविधा नसल्याने हा संघर्ष नित्याचाच झाला आहे.
या आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांनाही ज्ञानर्जनासाठी आठ-दहा किलोमीटरची पायपीट करून राजूरला यावे लागते. शाळा-महाविद्यालयांतून मिळणार्या प्रेरणादायी वक्त्यांची भाषणे, मार्गदर्शन, सोशल मीडियावरील प्रेरणादायी भाषणे व लिखाण त्यांना वाचावयास मिळते. त्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी पूर्ण क्षमतेने मानसिकदृष्ट्या तयार असतात. परंतु भौगोलिक परिस्थितीचा अडसर त्यांच्या शिक्षणात नेहमीच अडसर ठरत आलाय. ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक आपत्तींना झेलत डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना सातत्याने संघर्ष करावा लागतोय. पावसाळ्यात तर अक्षरशः जीव मुठीत धरुन विद्यार्थ्यांना वाट काढत शाळेत यावे लागते.
परंतु, स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही अजूनही विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पायी चालत कोसो अंतर कापण्याची दुर्दैवी वेळ येत असल्याने हे व्यवस्थेचे अपयशच आहे. अद्यापपर्यंत ना प्रशासनाला वाटले सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, ना लोकप्रतिनिधींना वाटले. त्यासाठी आता तरी डिजिटल इंडियामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने जागे होवून विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण मिळावे म्हणून एसटी बसची सोय करावी, अशी माफक अपेक्षा विद्यार्थी आणि पालक करत आहे.