कोविडच्या संकटात अडगळीत गेलेल्या कीर्तनकारांना ‘कोथमिरें’ची मदत! भागवत धर्माचा प्रसार करणार्या कीर्तनकारांना जीवनावश्यक वस्तूंच्या ‘किटस्’चे वाटप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील वर्षभरापासून जगभरात कोविडने अक्षरशः थैमान घातले आहे. नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी देशभरात गेल्यावर्षी कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला, तर सध्या राज्यात कठोर निर्बंध आहेत. या संपूर्ण कालावधीत इतर अनेक गोष्टींसह धार्मिक कार्यक्रमांनाही मनाई करण्यात आल्याने कीर्तनातून प्रपंच चालविणार्या कीर्तनकारांच्या समस्या दिवसोंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षभरापासून घरात बसून असलेल्या राज्यातील अशा हजारों कीर्तनकारांना आजवर सरकारकडून कवडीचीही मदत झालेली नाही. अशा स्थितीत सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असलेल्या संगमनेरच्या ‘कोथमिरे त्रिशूल छाप मसाले’ यांनी पुढाकार घेत तालुक्यातील कीर्तनकारांना जीवनावश्यक वस्तूंच्या ‘किटस्’चे वितरण करुन आपल्यातील सेवाभाव पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे.
गेल्या वर्षी 24 मार्च रोजी देशात कडकडीत लॉकडाऊन घोषित झाला होता. त्यानंतरच्या काळात घडलेले हजारो मजुरांचे स्थलांतर, गोरगरीबांची उपासमार आणि सामान्यजनांचे हाल अनेकांनी पाहिले. त्यावेळीही देशभरासह संगमनेरातील अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्था, उद्योग, आस्थापना व नागरिकांनी अशा गरजू आणि स्थलांतर करणार्यांना मदतीचा हात देत त्यांना माहामारीच्या पहिल्या संक्रमणात जिवंत राहण्यासाठी मदतीचा हात दिला. त्यावेळीही कोथमिरे परिवाराने आपले सामाजिक दायित्त्व पूर्ण करतांना गोरगरीबांना अन्नदानासह गरजूंना मदतीचा हात देत त्यांना कोविडच्या वादळातही पाय रोवून उभं राहण्यासाठी पाठबळ दिलं होतं.
यावर्षी फेब्रुवारीत कोविडच्या दुसर्या लाटेने राज्यात कहर केला. आणि संपूर्ण राज्य पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या गर्तेत उभे राहीले. मध्यंतरीच्या मोठ्या कालावधीत देशभरासह राज्यातील उद्योग-धंदे व बाजारपेठा खुल्या झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसत असतांना अचानक सुरु झालेल्या या संक्रमणाने पुन्हा एकदा गोरगरीबांसह सामान्य माणसांची परवड सुरु झाली आहे. त्यातच केवळ कीर्तन व प्रवचन करुन त्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या कीर्तनकारांचीही मोठी परवड सुरु आहे. जवळपास वर्षभराहून अधिक काळापासून धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असल्याने कीर्तन व प्रवचनाचे सर्व कार्यक्रम बंद आहेत. त्यातच शासनाकडून या सुदायाला कोणतीही मदत न मिळाल्याने अनेक कीर्तनकारांना सध्या विपरित स्थितीचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील कीर्तनकारांची सद्यस्थिती लक्षात घेवून संगमनेरच्या उद्योग विश्वात परिचित असलेल्या कोथमिरे त्रिशूल छाप मसाला परिवाराने आपले सामाजिक दायित्त्व ओळखून केवळ कीर्तनावरच जीवन जगणार्या तालुक्यातील अकरा कीर्तनकारांना जीवनावश्यक वस्तुंच्या कीटचे वितरण करुन संकटाच्या काळात त्यांना मदतीचा हात दिला आहे. संस्थेचे संचालक विवेक सुभाषराव कोथमिरे, विक्री व्यवस्थापक अण्णासाहेब गुंजाळ, संगमनेर वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प.दत्तात्रय महाराज भोर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सहकार्यवाह ज्ञानेश्वर थोरात यांच्या उपस्थितीत तालुक्यातील ठिकठिकाणच्या कीर्तनकारांना या मदतीचे वितरण करण्यात आले. कोथमिरे परिवाराने दाखवलेल्या या दातृत्त्वाबद्दल वारकरी संप्रदायाने त्यांचे आभार मानले आहेत.
सनातन हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यात कीर्तनकारांचा मोठा वाटा आहे. वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेवून जनमानसात कीर्तनाच्या रुपाने जनजागृती आणि प्रबोधन करण्यातही संप्रदायाची भूमिका खुप मोठी आहे. आयुष्यभर कीर्तन करणार्या आणि त्यावरच आपला प्रपंच चालविणार्या अशा असंख्या कीर्तनकारांची कोविडच्या संकटात मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. कार्यक्रमच बंद असल्याने अनेकांची उपासमार सुरु आहे. अशा स्थितीत कोथमिरे परिवाराने दुर्लक्षित असलेल्या कीर्तनकारांना मदतीचा हात दिल्याने संकटातही त्यांच्या चेहर्यावर समाधानाची लकेर उमटली आहे.