पठारभागात डोंगरांना आग लागण्याची श्रृंखला सुरूच…!

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील डोंगरांना यंदा मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत आहे. ही श्रृंखला अद्यापही सुरूच असून सोमवारी (ता.4) दुपारी डोळासणे शिवारातील डोंगराला मोठी आग लागली होती. मात्र वन विभागाच्या तत्परतेने ही आग आटोक्यात आली.

दरवर्षी उन्हाळ्यात पठारभागातील डोंगरांना आग लागण्याच्या घटना घडतात. आग लागू नये म्हणून म्हणून वन विभाग जाळपट्टेही मारतात. त्यामुळे आग लवकर आटोक्यात येत असते. मात्र यंदा कुरकुंडी शिवारातील डेर्‍या डोंगर, वडदरा, खंडोबाचा माळ, गारोळे पठार, भोजदरी, पेमरेवाडी, माहुली आदी भागातील डोंगरांना मोठ्या प्रमाणात वनवा लागून डोंगरावरील वनसंपदा खाक झाली आहे.

दरम्यान, घारगाव येथील वन परिमंडल अधिकारी रामदास थेटे यांच्यासह कर्मचार्‍यांनी ठिकठिकाणच्या आगी विझवल्या आहेत. तर अनेक ठिकाणी खासगी क्षेत्रेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. त्यामुळे कडक उन्हाळा सुरू झाला असून, नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

यावर्षी उन्हाळा प्रचंड आहे. अनेक शेतकरी आपले शेतीचे बांध पेटवून देत असतात. त्यामुळे शेतकर्‍यांनी बांध पेटवू नये. त्याचबरोबर आमच्याकडे आग विझवण्यासाठी फायर ब्लोअर मशीन असल्याने आग विझवण्यासाठी मोठी मदत होत आहे.
– रामदास थेटे (वन परिमंडळ अधिकारी, घारगाव)

Visits: 10 Today: 1 Total: 116905

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *