चालकाला मारहाण करून ट्रॉलीसह ट्रॅक्टर पळवून नेला कुकाणा-शेवगाव रस्त्यावरील घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणार्या दोन ट्रॉलीसह असलेला ट्रॅक्टर कुकाणा ते शेवगाव रस्त्यावर अडवला. त्यानंतर चालकाला मारहाण करून ट्रॅक्टर पळवून नेला. याबाबत नेवासा पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत भरत मारुती सरके (रा. न्हावरा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, महिंद्रा अर्जुन 555 (एमएच. 24, डी. 2885) हा ट्रॅक्टर विकत घेतला असून तो ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा येथे मुकादम विलास सरदार चव्हाण (रा. नागद, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांच्याकडे ऊस वाहतुकीसाठी लावला आहे. तसेच ट्रॅक्टरवर स्वतः चालक म्हणून काम करतो. 26 मार्चला न्हावरा येथे गेल्यामुळे ट्रॅक्टरवर सागर माधव चव्हाण हा टोळीतील ऊसतोड कामगार चालक म्हणून कामास होता. त्याने हा ट्रॅक्टर भेंडा कारखाना येथे ऊस खाली करून परत ऊस भरून आणण्यासाठी आखातवाडा (ता. शेवगाव) येथे कुकाणा रस्त्याने घेऊन जात होता. त्यावेळी त्याचा फोन आला की कुकाणा गावात न्यू इंग्लिश स्कूल येथे ट्रॅक्टरचा व एका मोटारसायकलचा समोरासमोर अपघात झाला आहे. त्यात मोटारसायकलवरील एका इसमास मार लागला आहे. त्याचे नाव नामदेव भिमा नरुटे (रा. वडुले, ता. नेवासा) असे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यास तू ट्रॅक्टर तसाच रस्त्याच्या बाजूला उभा कर व त्या जखमी इसमास उपचाराकामी मदत कर असे सांगितले. त्यानंतर जखमी इसमास कुकाणा येथे एका खासगी दवाखान्यात चालक व जखमी इसमाचे नातेवाईक यांनी नेले होते.

मात्र, त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा सागर चव्हाण याचा पुन्हा फोन आला की, ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करून ठेवला होता. त्यावेळी त्याठिकाणी तीन इसम हातामध्ये लाकडी दांडके व लोखंडी गज घेऊन आले. त्यांनी मला ‘तुला नीट ट्रॅक्टर चालविता येत नाही का? आमच्या माणसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला मारत होता काय?’ असे बोलून शिवीगाळ करून जमिनीवर खाली पाडले आणि माझ्या पाठीवर व पायावर लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने मारहाण करून दुखापत केली. तसेच खिशातील चावी बळजबरीने काढून घेतली व ट्रॅक्टर चालू करून दोन्ही ट्रेलरसह शेवगावच्या दिशेने घेऊन गेले.

कुकाणा ते शेवगाव रोडवर न्यू इंग्लिश शाळेजवळून हा ट्रॅक्टर व एक लाख रुपये किंमतीचा ट्रेलर (एमएच.12, ईबी. 7836) व एक लाख रुपये किंमतीचा दुसरा ट्रेलर (एमएच.12, ईबी.7837) असे एकूण 5 लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर व ट्रेलर संगनमताने नामदेव भिमा नरुटे व त्यांचा मुलगा सतीश नामदेव नरुटे व अन्य अनोळखी दोन इसम यांनी चालक सागर माधव चव्हाण यास लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने मारहाण करून जबरदस्तीने त्याच्या ताब्यातून घेऊन गेले. यावरून पोलिसांनी नामदेव भिमा नरुटे, सतीश नामदेव नरुटे व अन्य दोन अनोळखी इसम यांच्यावर गुरनं. 259/2022 भारतीय दंडविधान कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात हे करीत आहेत.
