राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाला भेट! लसीकरण केंद्राची केली प्रशंसा; लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना..
नायक वृत्तसंस्था, संगमनेर
जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढत असून शासन आणि प्रशासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सज्ज केल्या जात असून लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे ऊर्जा, पुनर्वसन व मदत, नगरविकास, आदिवासी, उच्च व तंत्र शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संगमनेरच्या ग्रामीण आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी लसीकरणासह ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना देण्यात येत असलेल्या आरोग्यसेवेबाबत समाधान व्यक्त करीत आरोग्यसेवकांच्या समर्पित सेवेचे कौतुकही केले.
राज्यात कोविडचे दुसरे संक्रमण सुरू असून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण शतपटीने वाढला आहे. त्या अनुषंगाने देशातील सर्व राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्यासह 45 वर्षावरील सर्व नागरिकांना सरसकट लसीकरणाचा मंत्र केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. त्यादृष्टीने राज्यात लसीकरणाला गती दिली जात असून खासगी रुग्णालयांची संख्याही वाढवण्यावर भर दिला जात आहे. संगमनेरातही घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्र व सात खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू आहे.
संगमनेरातील रोजची रुग्णवाढ लक्षात घेता येथील लसीकरणाचा वेग आणखी वाढणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी राज्याचे ऊर्जा, पुनर्वसन व मदत, नगरविकास, आदिवासी, उच्च व तंत्र शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी (ता.5) सकाळी संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी संगमनेरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड यांनी त्यांना लसीकरण आणि कोविड उपचारांबाबत सविस्तर माहिती दिली. लसीकरणादरम्यान येणार्या विविध अडचणी समजावून घेतांना त्यांनी त्यावर उपायही सूचविले.
वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविडचे संकट अनिश्चित वाटत असल्याचे सांगत त्यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्याची सूचना अधिकार्यांना केली. त्यासोबतच शासनाने 45 वर्षापेक्षा अधिक वयाच्या सर्वांसाठी लसीकरण खुले केल्याने या वयोटातील नागरिकांनी आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रावर नोंदणी करुन लसीकरण करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ.जर्हाड यांच्यासह पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आदिंसह घुलेवाडी येथील वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातून गेल्या 16 जानेवारीपासून आजपर्यंत 7 हजार 392 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात 60 वर्षांवरील 2 हजार 453 ज्येष्ठ नागरिकांनी पहिला तर सतरा नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्तांमध्ये आत्तापर्यंत 478 जणांनी पहिला तर चार जणांनी दुसरा डोस घेतला आहे. सोमवारपासून (ता.4) 45 वर्षांवरील सर्वासाठी लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय 2 हजार 696 आरोग्य कर्मचार्यांनी पहिला तर 702 कर्मचार्यांनी दुसरा, तर 796 फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला आणि 245 जणांनी दुसरा डोस घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया यांनी दिली. तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयातील लसीकरणाची आकडेवारी मात्र वेळेत उपलब्ध होवू शकली नाही.