… अखेर शेतकर्यांना फसविणार्या व्यापार्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या! जळगाव जिल्ह्यातून अटक, सहा दिवसांची पोलीस कोठडी; तर दोघा फरार आरोपींचा शोध सुरू

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील अनेक शेतकर्यांचा शेतमाल खरेदी करुन माळवाडगाव येथून कुटुंबासह पसार झालेल्या व्यापार्याला पत्नीसह पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातून अटक केली आहे. पोलिसांनी छापेमारी करुन गणेश रमणलाल मुथ्था (वय 50) व त्याची पत्नी आशाबाई गणेश मुथ्था (वय 45) यांना गणपूर (ता.चोपडा, जि.जळगाव) येथून शनिवारी मध्यरात्री अटक केली. रविवारी (ता.4) आरोपींना येथील तालुका पोलीस ठाण्यात आणले असून अधिक दोन आरोपी फरार असल्याने पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे.

पोलिसांनी गणेश मुथ्था याच्याकडून एक चारचाकी, एक दुचाकी, 50 हजार रुपये, काही मोबाईल व धनादेश पुस्तक (चेकबुक) जप्त केले आहे. आरोपींना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात रविवारी दुपारी हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना शनिवारपर्यं (ता.10) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली. पोलिसांनी यापूर्वी मुंबई, पालघर, बडोदा, नवसारी (गुजरात), जळगाव, औरंगाबाद येथे छापेमारी टाकून आरोपींचा शोध घेतला. परंतु, पसार व्यापारी कुटुंब पोलिसांना सापडत नव्हते.

अखेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी मध्यरात्री गणेश मुथ्था याला पत्नी समवेत जळगाव जिल्ह्यातील गणपूर (ता.चोपडा) येथून पकडले. अधिक चौकशीसाठी त्यांना पुढील सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. व्यापारी मुथ्था कुटुंबाने तालुक्यातील अनेक शेतकर्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना विशेष लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तपासाची चक्र फिरवून पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने मोठ्या शिताफितीने ही कारवाई केली.

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव, मुठेवाडगाव, भामाठाण व खानापूर परिसरातील अनेक शेतकर्यांचे सोयाबीन, हरभरा, मका (भुसारमाल) खरेदी धनादेश व पावत्या देवून पैसे देण्यापूर्वी व्यापारी रमेश मुथ्था कुटुंबासह रातोरात पसार झाला होता. सदर घटनेला दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्याने शेतकरी संताप व्यक्त होते. या प्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकर्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी रमेश मुथ्था, गणेश मुथ्था, चंदन मुथ्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.
