संगमनेर उपविभागात महिन्याला चौदा अपघाती मृत्यू! पोलीस उपअधीक्षकांचा अभ्यासपूर्ण अहवाल; महामार्गांवरील ‘हॉटस्पॉट’ही निश्चित..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर उपविभागातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गासह कोल्हार-घोटी व सिन्नर-लोणी राज्यमार्गावर गेल्या दीड वर्षात झालेल्या अपघातांचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अपघात प्रवण क्षेत्र, अपघाताच्या वेळा, वाहनांचे प्रकार आणि मयतांची संख्या यांचे विश्लेषण करण्यात आले असून त्या आधारे अपघात कमी करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी हा अहवाल तयार केला असून तो उपविभागासाठी दिशादर्शक ठरणार आहे. त्यांच्या या अहवालानुसार चालू वर्षात उपविभागातील वरील रस्त्यांवर एकूण ७९ अपघात घडले असून त्यातून ८४ जणांचा बळी गेला आहे. ही संख्या दररोज १४ जणांचा अपघाती मृत्यू होत असल्याचे दर्शवित असल्याने वाघचौरे यांनी उपविभागात अपघातमुक्त वाहतुकीसाठी पुढाकार घेतला असून त्यातून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सन २०२२ आणि २०२३ (जून अखेर) अशा दीड वर्षांचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. त्यानुसार गेल्या वर्षी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ अपघातांमध्ये २८ जणांचा, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ अपघातांतून ३५ जणांचा, अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच अपघातात पाच जणांचा, राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ घटनांमध्ये नऊ जणांचा, घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ अपघाती घटनांमध्ये २४ जणांचा, तर आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात अपघाती घटनांमध्ये सात जणांचा अशा एकूण शंभर अपघातांमध्ये वर्षभरात सरासरी महिन्याला नऊ याप्रमाणे एकूण १०८ जणांचा बळी गेला आहे.
तर, चालू वर्षात जूनपर्यंतच्या पहिल्या सहा महिन्यात उपविभागातील अपघाती घटना व त्यात मृत्यूमुखी पडणार्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. या अहवालानुसार गेल्या सहा महिन्यात शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ अपघातांमध्ये ३० जणांचा, तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ घटनांमध्ये १७ जणांचा अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० घटनांमध्ये १० जणांचा, राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपघातात एकाचा, घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ घटनांमध्ये २१ जणांचा तर आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच घटनांमध्ये पाच जणांचा अशा महिन्याला सरासरी १४ जणांच्या मृत्यूसह आजवर एकूण ७९ अपघातांमध्ये ८४ जणांचा बळी गेला आहे.
उपअधीक्षक वाघचौरे यांनी उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या वेगवेगळ्या अपघाती घटनांच्या विश्लेषणात वारंवार अपघात घडणारी ठिकाणं आणि अपघाताच्या वेळा यावरही प्रकाश टाकला आहे. त्यानुसार मध्यरात्रीपासून पहाटे तीन वाजेपर्यंतच्या कालावधीत गेल्या दीड वर्षात १४, पहाटे तीन ते सहा यावेळेत १३, सकाळी ६ ते ९ यावेळेत २५, सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळेत २०, दुपारी १२ ते ३ यावेळेत २४, दुपारी ३ ते सायंकाळी ६ यावेळेत २२, सायंकाळी ६ ते रात्री ९ यावेळेत सर्वाधिक ४२ तर रात्री ९ ते १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत १९ अपघातांची नोंद झाली आहे.
दीड वर्षातील या अपघातांमध्ये ज्या वाहनांचा अपघात झाला त्याचाही सविस्तर अभ्यास करण्यात आला असून त्यातून सर्वाधिक १३९ अपघाती घटना दुचाकीस्वारांच्या आहेत. त्याशिवाय ३६ घटनांमध्ये चारचाकी (कार), २० घटनांमध्ये ट्रॅक्टर, १८ घटनांमध्ये मालवाहक ट्रक, २२ घटनांमध्ये पिकअप व टेम्पो, चार घटनांमध्ये डंपर, तर प्रत्येकी दोन अपघात बस, रिक्षा व कंटेनरची धडक बसून घडल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. गेल्या वर्षी झालेल्या एकूण अपघातात ४१ घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घडल्या असून त्यातून ४४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर उपविभागातील दोन राज्यमार्गावरील ४१ घटनांमध्ये ४३ जणांचा जीव गेला आहे.
चालू वर्षातील पहिल्या सहा महिन्यात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ४२ अपघाती घटनांमध्ये ४३ जणांचा बळी गेला असून राज्य मार्गावरील वेगवेगळ्या १३ घटनांमध्ये १३ जणांनी आपला जीव गमावला आहे. अपघातमुक्त प्रवास घडावा यासाठी उपअधीक्षक वाघचौरे यांनी सातत्याने अपघात होत असलेली ठिकाणंही चिन्हांकित केली असून त्यावर उपाययोजना करण्याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर येणार्या संगमनेर शहर, तालुका व घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित रायतेवाडी फाटा (५ अपघात, ५ मृत्यू), संगमनेर खुर्द कचरा डेपो (४ अपघात, ४ मृत्यू), चंदनापूरी घाट (आनंदवाडी) (सहा घटना, सहा मृत्यू), कर्हेघाट (सात घटना, सात मृत्यू),
खंदरमाळ शिवार (खडी क्रशर) (४ घटना, ४ मृत्यू), बोटा (माळवाडी) (९ घटना, ९ मृत्यू), आंबी खालसा (७ अपघात, ७ मृत्यू), डोळासणे (५ अपघात, ५ मृत्यू) व माहुली घाट (३ अपघात, तीन मृत्यू). तर कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील मालपाणी टर्मिनलजवळ (६ घटना, ६ मृत्यू), कोकणगाव वळण व निमगाव जाळी चौफुली (प्रत्येकी ३ घटना, ३ मृत्यू) व नांदूर शिंगोटे-लोणी मार्गावरील तळेगाव दिघे, बाजारतळ (८ घटना, ८ बळी), राजूर पोलीस ठाण्यासमोरील चौक (३ अपघात, ३ मृत्यू) व कासारे वळण (३ घटना, ३ मृत्यू) अशी वेगवेगळी अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करण्यात आली असून पोलीस, महामार्ग पोलीस, महामार्ग प्राधिकरण व टोलप्लाझा यांच्याशी समन्वय साधून या रस्त्यांवरील अपघातांची संख्या कमी करुन नागरी जीव वाचवण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे संगमनेरातून कौतुकही होत आहे.
केवळ पोलीस अधिकारी म्हणून न वावरता मिळालेल्या अधिकाराचा जनमानसांसाठी कसा वापर करता येतो याचे उत्तम उदाहरण पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या येथील कार्यकाळातून उभे राहिले आहे. पोलीस म्हणजे केवळ चोर, गुन्हेगार अथवा अपप्रवृत्तींना नियंत्रणात आणणारा घटक नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवाचे रक्षण करणारा जीवरक्षकही असल्याचा वेगळा पैलू त्यांच्या या अभ्यासपूर्ण अहवालातून समोर आला आहे. अपघातांची श्रृंखला खंडीत होवून मानवी जीव वाचावा यासाठीच त्यांनी संपूर्ण उपविभागात वाहन तपासणीची मोहीमही सुरु केली असून अल्पवयीन मुलांच्या हाती कोणत्याही स्वरुपाची वाहने देवू नयेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.